रेमडेसिविर इंजेक्शनची नोंदणी एकाच्या नावाने दिले दुसऱ्याला; सोलापुरातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 06:41 PM2021-05-04T18:41:33+5:302021-05-04T18:41:44+5:30

मनपाने केली अचानक तपासणी : नोंदी व्यवस्थित ठेवल्या नसल्याचा ठपका

Registration of remedivir injection given in the name of one to another; Types in Solapur | रेमडेसिविर इंजेक्शनची नोंदणी एकाच्या नावाने दिले दुसऱ्याला; सोलापुरातील प्रकार

रेमडेसिविर इंजेक्शनची नोंदणी एकाच्या नावाने दिले दुसऱ्याला; सोलापुरातील प्रकार

googlenewsNext

सोलापूर : ज्या रुग्णाच्या नावे रेमडेसिविर इंजेक्शन दिले ते त्याला न देता दुसऱ्याच रुग्णाला दिल्याचे मनपाच्या अधिकाऱ्यांनी एका हॉस्पिटलची अचानक तपासणी केल्यावर समोर आले. त्या हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.

सोलापुरात गेल्या पंधरा दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे शासनामार्फत इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. राखीव इंजेक्शन ग्रामीण व शहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या गरजू रुग्णांना वाटप करण्यात येत आहे. हॉस्पिटलला हे इंजेक्शन पुरविल्यानंतर त्यांनी कोणाकोणाला डोस दिला याची माहिती महापालिकेला देणे बंधनकारक आहे. त्यामुळे मनपाच्या पथकाने रविवारी रात्री एका हॉस्पिटलमध्ये तपासणी केली असता त्या ठिकाणी ॲडमिट असलेल्या जुन्या पेशंटच्या नावे इंजेक्शन घेण्यात आले व ते दुसऱ्याच रुग्णाला वापरण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. हॉस्पिटलने इंजेक्शनचा गैरवापर केल्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, असे आदेश दिल्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून शहर व जिल्ह्यातील सर्व खाजगी व सरकारी हॉस्पिटलला रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात येत आहे. संबंधित हॉस्पिटलने या इंजेक्शनच्या नोंदी व्यवस्थितपणे ठेवायच्या आहेत. ज्या रुग्णांसाठी इंजेक्शन दिले आहे, त्या रुग्णाला पुढील इंजेक्शन मिळण्यासाठी ऑनलाइन नोंद कळविणे आवश्यक आहे. जर रुग्णालयाने अशी नोंद न कळविल्यास संबंधित रुग्णाला दुसरे इंजेक्शन मिळणार नाही, तसेच हॉस्पिटलने ज्या रुग्णांच्या नावे इंजेक्शन्स घेतली आहेत, त्याच्या नोंदी व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. मनपाच्या पथकामार्फत अचानक तपासणी करण्यात येणार आहे. ज्या रुग्णालयात नोंदी आढळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

ही तर फसवणूक...

कोविड हॉस्पिटल्सनी ज्या रुग्णांसाठी रेमडेसिविरची मागणी केली आहे, ते इंजेक्शन त्याच रुग्णांसाठी वापरायचे आहे. डोस मिळाला कधी व रुग्णाला दिला कधी याची केसपेपरवर नोंद घ्यायची आहे. मागणी केलेला रुग्ण नसेल तर तो डोस परस्पर दुसऱ्या रुग्णांना वापरता येणार नाही. याची माहिती महापालिकेला कळविणे गरजेचे आहे. परस्पर एका रुग्णाच्या नावाचे इंजेक्शन दुसऱ्या रुग्णांना देणे ही फसवणूक होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Registration of remedivir injection given in the name of one to another; Types in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.