शिवजयंतीचे औचित्य; मुस्लिम बांधवांनी काढलेल्या एकता रॅलीने वेधले सोलापूरकरांचे लक्ष
By Appasaheb.patil | Updated: February 19, 2024 17:24 IST2024-02-19T17:23:10+5:302024-02-19T17:24:02+5:30
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्ताने मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरने हा आगळावेगळा उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

शिवजयंतीचे औचित्य; मुस्लिम बांधवांनी काढलेल्या एकता रॅलीने वेधले सोलापूरकरांचे लक्ष
सोलापूर : रॅलीत सर्वात पुढे तिरंगा हाती घेऊन घोडेस्वार.. त्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मुस्लिम सरदार मावळ्यांचे नाव आणि पद उल्लेख केलेले फलक हाती घेतलेले युवक...सर्वधर्मसमभावचा संदेश देणारे मुस्लिम बांधवांनी यंदाच्या वर्षीही शिव एकता रॅली काढली. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्ताने मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरने हा आगळावेगळा उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
रंगभवन येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माजी महापौर आरिफ शेख, माजी उपमहापौर नानासाहेब काळे, राजन जाधव, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष शफीक रचभरे, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, मातंग समाज शहराध्यक्ष युवराज पवार भटक्या विमुक्त जमाती अध्यक्ष प्रा विष्णू गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीस सुरुवात करण्यात आली. सदर रॅली विजापूर वेस मार्गे नवी पेठेतून छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जन करण्यात आली. यावेळी बेगम पेठ येथे अल्ताफ लिंबूवाले इम्तियाज कमिशनर यांनी पुष्पहार अर्पण करून स्वागत केले.
विजापूर वेस येथे बागवान जमातीच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. नवी पेठेत व्यापारी विजय भोईटे, सिताराम लांडे यांनी स्वागत केले. या प्रसंगी मराठा सेवा संघाचे पोपट भोसले, प्रा.संजय जाधव प्रा. यादव अल्ताफ लिंबूवाले, इम्तियाज कमिशनर, जुबेर कुरेशी, युन्नुसभाई डोणगावकर, तन्वीर शेख, रियाज पैलवान, नईम करनूल, तन्वीर गुलजार, बशीर सय्यद, मुबिन सय्यद, राजू हुंडेकरी, जावेद बद्दी, रिजवान शेख आदी उपस्थित होते.