Reality Check; Citizens are allergic to helmets and police to masks | रिअ‍ॅलिटी Check; नागरिकांना हेल्मेटची तर पोलिसांना मास्कची अ‍ॅलर्जी...!

रिअ‍ॅलिटी Check; नागरिकांना हेल्मेटची तर पोलिसांना मास्कची अ‍ॅलर्जी...!

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्नदुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी सायंकाळी जारी केलेगेल्या काही दिवसांपासून दुचाकीवर डबलसीटला परवानगी देण्यात आली

सोलापूर : संचारबंदी उठल्यानंतर शहरात पुन्हा रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेले मास्क काही लोक घालतात तर काही लोक तसेच फिरत आहेत. क्वचित काही लोकांच्या डोक्यावर हेल्मेट दिसत आहे. त्यामुळे ना मास्क.. ना हेल्मेट.. सोलापुरात दुचाकीस्वार बिनधास्त असं चित्र पहावयास मिळत आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. २३ मार्च रोजी सोलापुरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधीनंतर हळूहळू संचारबंदी उठविण्यात आली. दि. १६ ते २६ जुलैदरम्यान पुन्हा कडकडीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. दि. २७ जुलैपासून वाहनांना परवानगी देण्यात आली. 

दुचाकी वाहनावर फक्त एकाच व्यक्तीला प्रवास करता येत होता. गेल्या काही दिवसांपासून दुचाकीवर डबलसीटला परवानगी देण्यात आली आहे, मात्र दोघांनीही मास्क आणि हेल्मेट घातले पाहिजे, अशी अट घालण्यात आली आहे. संचारबंदी उठली म्हणून आता सोलापूरकर घराबाहेर बिनधास्तपणे पडत आहेत. मोटरसायकलवरून फिरणारी बरीच मंडळी मास्क न घालता बिनधास्तपणे फिरत असल्याचे दिसून आले. 

हेल्मेट असेल तर मास्कची सक्ती का?
पोलीस आयुक्तालयाच्या वतीने काढलेल्या आदेशाप्रमाणे काही दुचाकीस्वार प्रामाणिकपणे हेल्मेट परिधान करतात, तोंडाला मास्क लावतात मात्र यामुळे त्रास होतो. श्वास घेण्यासाठी त्रास होतो, सतत मास्क व हेल्मेट वापरल्यामुळे बांधल्यासारखं होतं. मोटरसायकल चालवताना अवघडल्यासारखं होतं. प्रशासनाने तूर्तास कोरोनाचे संकट टळेपर्यंत हेल्मेटची सक्ती करू नये. हेल्मेट सक्ती असेल तर त्याला मास्कची सक्ती करू नये, अशा प्रतिक्रिया ‘लोकमत’शी बोलताना दिल्या.

मास्कमुळे दम लागतो...
हेल्मेट आणि मास्क या दोन्ही गोष्टी तोंडाला आणि डोक्याला लावून घराबाहेर पडायचं म्हटलं तर खूप जीवावर येतं. मोटरसायकल चालवताना चौफेर नजर राहत नाही. मास्कमुळे दम लागल्यासारखे होते, असे मत रेल्वे कर्मचारी समाधान कोळी यांनी व्यक्त केले.

हेल्मेट, मास्क न घातल्यास आता कारवाई
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत असताना नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. राखी पौर्णिमेनिमित्त दुचाकीस्वार विनाहेल्मेट मोठ्या संख्येने रस्त्यावर आल्याचे दिसून आल्यावर आता अशा दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी सायंकाळी जारी केले आहेत. 
नागरिकांनी सार्वजनिक स्थळी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासामध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, चेहºयावर मास्क/रुमाल वापरणे बंधनकारक आहे. स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक असून नाक, डोळे व तोंड यांना स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी. 
अत्यावश्यक परिस्थितीमध्ये दुचाकीवर दोघे हेल्मेट व मास्कसह, तीनचाकी वाहनात चालक व इतर दोन, चारचाकी वाहनात चालक व इतर तिघे आणि रिक्षात चालक व इतर तिघांना परवानगी असेल, असा आदेश काढण्यात आला आहे.

प्रवाशांच्या संरक्षणासाठी हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. मोटरसायकल चालवणाºया व्यक्तीने हेल्मेट परिधान केलेच पाहिजे. हेल्मेटने पूर्ण तोंड झाकलं जात असेल तर त्याला मास्क लावण्याची गरज नाही. पाठीमागे बसणाºया व्यक्तीने मास्क लावावा. विनाहेल्मेट फिरणाºयांवर कारवाई होणारच. 
-बाळासाहेब भालचिम,
पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा 

Web Title: Reality Check; Citizens are allergic to helmets and police to masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.