रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा १० रुपये; अनलॉकनंतर रेल्वेची प्रवासी संख्या वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 02:36 PM2021-06-22T14:36:48+5:302021-06-22T14:36:54+5:30

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने आता रेल्वेला प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे.

Railway platform ticket again Rs. 10; The number of passengers on the train is increasing after the unlock | रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा १० रुपये; अनलॉकनंतर रेल्वेची प्रवासी संख्या वाढतेय

रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा १० रुपये; अनलॉकनंतर रेल्वेची प्रवासी संख्या वाढतेय

googlenewsNext

सोलापूर : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने आता रेल्वेला प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. सोलापूरहून मुंबई, पुण्यासह तिरुपतीच्या बालाजी दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक दिसून येत आहे. अनलॉक झाल्यानंतर रेल्वेने ५० रुपये प्लॅटफॉर्म तिकिटाची रक्कम आता १० रुपये केली आहे. दुसरीकडे कोरोनाकाळात सोलापूरमार्गे धावणाऱ्या बऱ्याच मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर रेल्वे बंदच असल्याने सोलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीही मंदावली आहे.

दुसऱ्या टप्प्यात मार्च महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने निर्बंध कडक करण्यात आले होते. त्यामुळे प्रवासावरही मर्यादा आल्या. दुसऱ्या लाटेत जवळपास दीड ते दोन महिने रेल्वेसेवा प्रभावित होती. अनलॉकच्या टप्प्यात आता रेल्वेसेवा पूर्ववत झाली आहे. दुसरीकडे पॅसेंजर रेल्वे अद्यापही बंदच आहेत. एक्स्प्रेस रेल्वे प्रवासाला प्रवाशांचा हळूहळू प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. सोलापूरहून धावणाऱ्या सिद्धेश्वर, इंद्रायणी, इंटरसिटीसह अन्य रेल्वे गाड्या व पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

 

तरच...प्लॅटफॉर्म तिकीट विक्री वाढेल...

सोलापूर विभागात विशेष एक्सप्रेस गाड्या सुरू आहेत. कोरोनाकाळात सोलापूरसह विभागातील अन्य रेल्वे स्थानकावर फारशी गर्दी नव्हती. पॅसेंजरही बंद असल्याने प्रवासी संख्या घटली होती. नियमित व पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य लोक रेल्वेने मोठ्या प्रमाणात प्रवास करतील, त्यामुळे प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीच्या संख्येेत वाढ होईल असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष एक्सप्रेसचा दर्जा असलेल्या गाड्या आता नियमित कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

०००००

प्रवासी संख्या हळूहळू वाढतेय...

अनलॉकच्या टप्प्यात प्रवासावरील निर्बंध हटले आहेत. सोलापूरमार्गे काही एक्सप्रेस रेल्वे धावतात. त्यामुळे प्रवासी संख्या हळूहळू वाढत असल्याचे दिसून येते. सोलापूरहून मुंबई, पुण्यासह तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी सोलापुरातून जाणाऱ्या भाविकांची संख्या सर्वात जास्त आहे. सध्या सोलापूर स्टेशनवरून हैदराबाद, तिरुपती, मुंंबई, पुणे, दिल्लीसह अन्य शहराकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे बऱ्याच रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. पहिली लाट ओसरल्यामुळे काही काळासाठी रेल्वेसेवा पुन्हा पूर्ववत झाली; परंतु त्यानंतर अल्पावधीतच कोरोनाची दुसरी लाट आली. दुसऱ्या लाटेत जवळपास तीन महिने रेल्वेसेवा पुन्हा प्रभावित झाली. अनलॉकच्या टप्प्यात सोलापूरमार्गे बऱ्याच एक्स्प्रेस गाड्या धावत आहेत. हळूहळू प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. लवकरच गाड्यांच्या संख्येतही वाढ हाेईल.

- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, सोलापूर मंडल.

 

 

Web Title: Railway platform ticket again Rs. 10; The number of passengers on the train is increasing after the unlock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.