उजनीच्या पातळीत झपाट्याने वाढ
By Admin | Updated: August 6, 2014 01:06 IST2014-08-06T01:06:12+5:302014-08-06T01:06:12+5:30
धरणात पाच टक्क्यांनी वाढ

उजनीच्या पातळीत झपाट्याने वाढ
बेंबळे: उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील पुणे जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरल्याने त्यामधून पाणी सोडण्यात आले असून उजनीमध्ये ९३ हजार क्युसेक्सचा विसर्ग मिसळत असल्याने उजनी धरणाच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासात धरणात पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने बुहतांश धरणे भरली आहेत. त्यापैकी आठ धरणांतून सध्या पाणी सोडले जात आहे.
मुळशी धरणातून ३० हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. याशिवाय चासकमानमधून १३,४६८ क्युसेक्स, वडिवलेमध्ये पाच हजार क्युसेक्स, कासारसाईमधून १९५८, खडकवासलातून १३,२४०, कलमोडीतून ६२८ आणि वडजमधून २८२६ क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे ७०,१२९ क्युसेक्सचा विसर्ग उजनीत येत आहे. याशिवाय इंद्रायणी नदीच्या परिसरातही चांगला पाऊस असल्याने तो प्रवाह थेट दौंड येथे भीमा नदीत मिसळत आहे. बंडगार्डन येथील विसर्गात वाढ झाली असून ९३४७७ क्युसेक्स इतका प्रवाह भीमेत येत आहे. त्यामुळे उद्या बुधवारी उजनीच्या पातळीत लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. मंगळवारी रात्री १० पर्यंत धरणात अधिक २२.०२ टक्के साठा झाला होता.