बारामतीला धक्का; अकलूजचं ‘समाधान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 16:33 IST2019-12-31T14:53:34+5:302019-12-31T16:33:55+5:30
काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते एकत्र येऊनही सोलापूर झेडपीत ‘समविचारी’ गटाचा अध्यक्ष अन् उपाध्यक्ष

बारामतीला धक्का; अकलूजचं ‘समाधान’
सोलापूर : जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजप पुरस्कृत समविचारी आघाडीचे अनिरूध्द कांबळे याची तर उपाध्यक्षपदी आवताडे गटाचे दिलीप चव्हाण यांची निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी संदीप जाधव यांनी केली. या निवडणूकीत राष्ट्रवादी अन् काँग्रेसची दिग्गज नेते मंडळी एकत्र येऊनही मोहिते-पाटील गटानं ‘दे धक्का’ दिला. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत समाधान आवताडे गटाची साथ मिळाल्यानं ‘बारामतीला धक्का’ बसला तर समविचारी गटाचं ‘समाधान’ झालं.
मंगळवारी सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली़ यावेळी भाजप पुरस्कृत समविचारी गटाच्या बाजूने अध्यक्षपदासाठी मोहिते-पाटील गटाचे अनिरूध्द कांबळे (केम ता. करमाळा ) तर महाविकास आघाडीकडून त्रिभुवन धार्इंजे (वेळापूर, ता़ माळशिरस) यांच्यात लढत झाली. यावेळी कांबळे यांना ३७ तर धार्इंजे यांना २९ मते मिळाली़. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत समविचारीकडून आवताडे गटाचे दिलीप चव्हाण व महाविकास आघाडीकडून विक्रांत पाटील (बाळराजे) यांच्यात लढत झाली. यात चव्हाण यांना ३५ तर बाळराजे यांना ३१ मते मिळाली. अशाप्रकारे उपाध्यक्षपदी समविचारी गटाचे दिलीप चव्हाण विजयी झाले. अशाप्रकारे जिल्हा परिषदेवर भाजप पुरस्कृत समविचार आघाडीचा पुन्हा एकदा झेंडा फडकला आहे. या निवडीनंतर जिल्हा परिषद परिषद परिसरात जल्लोष करण्यात आला. काँग्रेसचे मल्लिकार्जुन पाटील हे समविचारी आघाडीच्या बाजुने होते़ आता उपाध्यक्षपदासाठी निवडणूक सुरू आहे.
प्रारंभी अध्यक्षपदाची निवडणूक सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश पाटील यांनी सदस्यांना व्हिप बजाविण्यास परवानगी द्यावी अशी विनंती निवडणुक निर्णय अधिकाºयाकडे केली होती़ यावेळी भाजपच्या सदस्यांनी या विनंती मागणीला विरोध केला़ तत्पुर्वी निवडणुक निर्णय अधिकाºयानी कायद्यात तशी तरतूद नाही असे सांगून राष्ट्रवादीची विनंती फेटाळली.