भांडवली कामांसाठी ४० लाख तर हद्दवाढ भागातील नगरसेवकांना ५० लाख रुपयांची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 13:09 IST2021-02-05T13:08:59+5:302021-02-05T13:09:02+5:30
महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत महापालिकेची जानेवारीअखेर २७ टक्के करांची वसुली

भांडवली कामांसाठी ४० लाख तर हद्दवाढ भागातील नगरसेवकांना ५० लाख रुपयांची तरतूद
हद्दवाढच्या नगरसेवकांना ५० लाखांची तरतूद
सोलापूर : दोन महिन्यांच्या अंदाजपत्रकात शहरातील नगरसेवकांना भांडवली कामांसाठी ४० लाख तर हद्दवाढ भागातील नगरसेवकांना ५० लाख रुपयांची तरतूद केल्याचे सभागृहनेता श्रीनिवास करली यांनी सांगितले.
महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत महापालिकेची करांची एकूण वसुली जानेवारीअखेर २७ टक्के झाली आहे. उर्वरित दोन महिन्यांत उत्पन्नाची बाजू वाढली तरच हा निधी मिळणार असल्याचे संकेत ज्येष्ठ नगरसेवकांनी दिले. भाजपने गोंधळात बजेट मंजूर केल्यानंतर विरोधी पक्षनेता अमोल शिंदे यांच्यासह महेश कोठे यु. एन. बेरिया, चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे, किसन जाधव, रियाज खरादी यांच्यासह नगरसेवकांनी आयुक्त पी. शिवशंकर यांचे दालन गाठले. नगरसचिवांनी विषयाचे वाचन केले नाही. आम्ही उपसूचना वाचली नाही. तरीही बजेट मंजूर केल्याचे जाहीर करण्यात आले. हे नियमबाह्य काम रोखण्यात यावे. नगरसचिवांवर कारवाई करावी अशी मागणी नगरसेवकांनी केली.
सभेच्या कामकाजाचा इतिवृत्तांत आमच्याकडे सादर होईल. सदस्यांचे आक्षेप काय आहेत हे समजून घेण्यात येतील. त्यानंतरही सदस्यांना काही अडचण असेल तर कायदेशीर मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करण्यात येईल.
- पी. शिवशंकर, आयुक्त.