कुरुल : कामती पोलीस स्टेशनची सध्याची इमारत ही पोलिसांच्या दैनंदिन कामकाजासाठी गैरसोयीची ठरली आहे. नवीन सुसज्ज इमारत उभी करण्याची मागणी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे केली.
मोहोळ तालुक्यात दक्षिण भागातील २८ गावांसाठी २०१२-१३ मध्ये कामती पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. एका खोलीत सुरू झालेले पोलीस ठाण्याचे कामकाज आता लोकवर्गणीतून व पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून चार खोल्यात चालते. येथून नागपूर-सोलापूर, कोल्हापूर-रत्नागिरी व मोहोळ - कुरुल, कामती-कोरवली, मंद्रुप-तेरा मैल या दोन राष्ट्रीय महामार्गावर कामती येथील पोलीस स्टेशनची जागा अपुरी आहे. येथे येणाऱ्या नागरिकांना बसायला जागा अपुरी पडते आहे.
एखादी गंभीर घटना घडली, तर पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी यांना नाहक त्रास होताे. महिला कर्मचाऱ्यांना या कार्यालयात बसायचे, वावरायचे अवघड झाले आहे. तक्रार घेताना ठाणे अंमलदार यांना जागेअभावी त्रास होतो. त्यामुळे अपुऱ्या जागेतील कायमचा त्रास संपविण्यासाठी या पोलीस ठाण्याच्या कार्यालयाच्या स्थलांतराची परवानगी देऊन नवीन बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना नवीन पोलीस वसाहत बांधून देऊन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आधार द्यावा, असे देशमुख यांनी गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
जनहितच्या या मागणीची दखल घेत गृहराज्यमंत्र्यांनी बैठक लावण्याचे आश्वासन दिल्याचे देशमुख यांनी सांगितले.
---
फोटो :१० कुरुल
कामती पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीचे निवेदन गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांना देताना प्रभाकर देशमुख.