पंतप्रधानांनी मनाचा खुजेपणा दाखविला
By Admin | Updated: August 19, 2014 00:56 IST2014-08-19T00:56:04+5:302014-08-19T00:56:04+5:30
मुख्यमंत्री चव्हाण : प्रकल्पांच्या उद्घाटनात शिंदे यांचा नामोल्लेख टाळला

पंतप्रधानांनी मनाचा खुजेपणा दाखविला
सोलापूर: काँग्रेस आघाडी सरकारने आणि सुशीलकुमार शिंदे यांनी आणलेल्या मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन करताना साधा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला नाही. यातून त्यांच्या मनाचा खुजेपणा दिसला, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींच्या सोलापुरातील सभेचा खरपूस शब्दात समाचार घेतला. राजकीय हेतूने प्रेरित होऊन पंतप्रधानांनी सोलापुरातील कार्यक्रम केल्याचा आरोपही त्यांनी केला.
दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात पॉवरग्रीड आणि सोलापूर-पुणे चौपदरीकरणाचे लोकार्पण केले होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सुशीलकुमार शिंदे यांचा नामोल्लेख टाळल्याची खंत त्यांनी आज सोलापुरात काँग्रेस भवनात व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांच्या कार्यालय नूतनीकरणाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे तर माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, परिवहनमंत्री मधुकर चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री चव्हाण यांनी गुजरातपेक्षा महाराष्ट्र सर्वच बाबतीत आघाडीवर असल्याचा पुनरूच्चार केला. ते म्हणाले, मोदींनी गुजरातमध्ये एकाधिकारशाही राबवली. आमदारांचे प्रश्न सोडवले नाहीत. मंत्र्यांना कधीच स्वातंत्र्य दिले नाही. काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी काम केले आणि स्वत:चे मार्केटिंग केले. त्यांना ते उत्तम जमते इतकेच. जनहिताचे निर्णय, विकासाचे मोठे प्रकल्प यात महाराष्ट्र गुजरातपेक्षा कितीतरी पुढे आहे. पाळत ठेवण्याच्या कामासाठी मोदींनी पोलिसांची मदत घेतली. त्यांच्याविषयी न बोललेलेच बरे, अशी कोपरखळी मुख्यमंत्र्यांनी मारली.
काँग्रेस पक्षाने विकासकामे केली परंतु त्याचे मार्केटिंग करण्यात कमी पडले याचे स्मरणही मुख्यमंत्र्यांनी करून दिले. विधानसभा निवडणुकीत मोबाईल, व्हॉट्स अप, फेसबुक, हाईक अशा नव्या तंत्राचा वापर करून सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. धनगर, लिंगायत, महादेव कोळी, वडार आदी समाजाच्या आरक्षणप्रश्नी योग्य तो मार्ग काढला जाईल. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. मात्र सामाजिक प्रश्न गंभीर होऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन समाजाच्या नेत्यांना केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावर झालेल्या भाषणाचा उल्लेख करून सुशीलकुमार शिंदे यांनी भविष्याचा अंदाज त्यांच्या भाषणातून दिसला नाही. बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी बोलता खूप येते पण कृतीचे काय ? असा सवालही त्यांनी केला. आम्ही विकासकामांचा डोंगर उभा केला. पण प्रसिद्धीस कमी पडलो. मोदींनी बीएसपी (बिजली, सडक, पानी) चा केवळ उल्लेख केला. २००९ साली सोलापूरसाठी तीन दिशेला चौपदरी रस्त्याची कामे हाती घेतली. १० हजार कोटींचा एनटीपीसी प्रकल्प केला. त्याची पूर्तता आम्हीच आधी केली, त्यांना कल्पना नसेल, असा टोला शिंदेंनी लगावला.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सध्याच्या दुष्काळी स्थितीची चिंता व्यक्त केली. दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आली तरी निवडणूक आयोग किंवा आचारसंहितेची अडचण येणार नसल्याचे सांगितले. सुशीलकुमार शिंदे यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा विधानसभेत काढा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याची तर शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी धनगर, लिंगायत, वडार, महादेव कोळी यांच्या आरक्षणाचे प्रश्न सोडविण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.
व्यासपीठावर आ. भारत भालके, आ. दिलीप माने, आ. प्रणिती शिंदे, आ. अमर राजूरकर, आ. हरिभाऊ राठोड, माजी मंत्री आनंदराव देवकते, सिद्धाराम म्हेत्रे, वस्त्रोद्योग महामंडळाचे नूतन अध्यक्ष चंद्रकांत दायमा, सुधीर खरटमल, धर्मण्णा सादूल, बाळासाहेब शेळके, धर्मा भोसले, सुवर्णा मलगोंडा, संजय हेमगड्डी, बाबासाहेब आवताडे, देवेंद्र भंडारे, राजेश पवार, बाळासाहेब दुबे आदी उपस्थित होते.
-----------------------------------
सर्वमान्य तोडगा काढू
राज्यात धनगर आणि आदिवासी समाजात आरक्षणाच्या मुद्यावर संघर्ष सुरू आहे. दोन्ही समाजाला विश्वासात घेऊन सर्वमान्य तोडगा लवकरच काढणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. कोळी समाजाच्या प्रश्नांसाठी बाळासाहेब थोरातांच्या अध्यक्षतेखालील समिती काम करीत आहे. त्यांना नोकरीत संरक्षण देण्याची मागणी योग्य आहे. कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ. मात्र सामाजिक ऐक्य कायम ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.
------------------------------
कुठे गेली आश्वासने ?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाचे आरक्षण आणि सोलापुरी चादरीचे पोलिसांना गणवेश शिवण्याचा मुद्दा छेडला होता. याचा उल्लेख करताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, कुठे गेली तुमची आश्वासने ? बोलून गेलात त्याची पूर्तता कोण करणार ? वाटले होते सोलापूरला येताना त्यातले काही तरी देऊन जातील पण केला ना शेवटी जनतेचा भ्रमनिरास.