पंतप्रधान मोदी मराठा आरक्षणासाठी वेळ देतील पण राजकीय सिनियर सिटीझन्सचे प्रयत्न हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 05:50 PM2021-02-08T17:50:32+5:302021-02-08T17:50:38+5:30

संवाद यात्रा : नरेंद्र पाटील यांची शरद पवारांवर टीका

Prime Minister Modi will give time for Maratha reservation but the efforts of political senior citizens are needed | पंतप्रधान मोदी मराठा आरक्षणासाठी वेळ देतील पण राजकीय सिनियर सिटीझन्सचे प्रयत्न हवेत

पंतप्रधान मोदी मराठा आरक्षणासाठी वेळ देतील पण राजकीय सिनियर सिटीझन्सचे प्रयत्न हवेत

Next

सोलापूर : महाराष्ट्रातील काही प्रश्न घेऊन राज्यातले काही राजकीय सिनियर सिटीझन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटतात. पण मराठ्यांचे प्रश्न घेऊन कुणीच जात नाही. पंतप्रधान मोदी इतर प्रश्नांसाठी तुम्हांला वेळ देतात. तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केले तर मराठा आरक्षणासाठी वेळ देतील, असा टोला अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी शरद पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला.

मराठा आरक्षणावर राज्यस्तरीय आंदोलन उभारण्याच्या तयारीसाठी नरेंद्र पाटील यांनी येथील शासकीय विश्रामगृहात समाजबांधवांची बैठक घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मनपाचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, दास शेळके, माजी नगरसेवक अनंत जाधव, मराठा ठोक क्रांती मोर्चाचे राम जाधव, किरण पवार आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षणाच्या विषयात केंद्र सरकारने हस्तक्षेप केलाच पाहिजे. त्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह इतर खासदारांनी वेळ दिला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आपले मुद्दे सांगितले पाहिजेत. पण दिल्लीत जाणारे काही लोक यासाठी वेळच देत नाहीत. इतर राजकीय लोकही शेतकरी आंदोलनासाठी इतर प्रश्न घेऊन जातात. मग आरक्षणाच्या प्रश्नावर का जात नाही? प्रकाश शेंडगें हे महाआघाडीचे नेते आहेत. सध्या ते मराठा आरक्षणाविरुध्द विधाने करीत आहेत. ओबीसी आणि मराठा समाजात विचारांचा वाद निर्माण व्हावा. मराठा आरक्षणाचे घोंगडे असेच भिजत रहावे असा महाआघाडी सरकारचा प्रयत्न आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

यासाठी करणार समाजाची एकजूट

भाजप सरकारने दिलेले आरक्षण महाआघाडी सरकारच्या काळात गेले. आघाडी सरकारबद्दल लोकांच्या मनात नाराजी आहे. समाजबांधवांची एकजूट करण्याचा प्रयत्न आहे. आगामी काळात राज्यात कोणतेही सरकार आले आणि त्यांनी मराठा समाजाच्या विरोधात एखादा निर्णय घेतला तर त्याला विरोध करण्यासाठी समाजाची एकजूट आवश्यक आहे. त्यासाठी विविध पक्षात विखुरलेल्या समाजबांधवांना एकत्र करण्यात येत असल्याचे पाटील म्हणाले.

---

Web Title: Prime Minister Modi will give time for Maratha reservation but the efforts of political senior citizens are needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.