रस्त्यावर खड्डे; वाहने खिळखिळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:29 IST2020-12-30T04:29:46+5:302020-12-30T04:29:46+5:30
---- वाढत्या थंडीमुळे उबदार कपड्यांना मागणी सोलापूर : गेल्या १५ दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. शहर-जिल्ह्यात भल्या पहाटे ...

रस्त्यावर खड्डे; वाहने खिळखिळी
----
वाढत्या थंडीमुळे उबदार कपड्यांना मागणी
सोलापूर : गेल्या १५ दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. शहर-जिल्ह्यात भल्या पहाटे आणि संध्याकाळी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. याचबरोबर थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे खरेदी करण्याकडेही लोकांचा कल वाढला आहे. शहरातील पार्क चौक, तालुक्यातील बाजारपेठेत विविधरंगी स्वेटरपासून मफलर, स्कार्फ पहायला मिळत आहेत.
----
दवाखान्यात वाढू लागली गर्दी
उत्तर सोलापूर : जिल्ह्यात थंडी वाढू लागल्यामुळे सर्दी, खोकला आजाराचे रुग्ण वाढत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते खासगी रुग्णालयात रुग्णांच्या रांगा लागत आहेत. त्यातच कोरोनाची भीती असल्यामुळेही लोकांमधून चिंता व्यक्त होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींकडून थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.
-----
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लगबग सुरू
दक्षिण सोलापूर : जिल्ह्यात ६५४ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रक्रिया सुरू आहे. आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस उरले आहेत. उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरण्याची प्रक्रिया असल्यामुळे अनेकांची सेवा केंद्रावर गर्दी होत आहे. स्टँप व्हेंडरसारखी काही मंडळी लॅपटॉप घेऊन अर्ज भरून देत आहेत. त्या बदल्यात इच्छुक उमेदवारांकडून पैसे घेऊन ही सेवा दिली जात आहे.
-----
बिबट्याच्या अफवा पसरवू नका
माढा : करमाळा तालुक्यात बिबट्याने हैदोस माजवला. तिघांना जीव गमवावा लागला. आता माढा तालुक्यातील उंदरगाव परिसरातही तो दिसल्याच्या वार्तेने नागरिक भयभीत झाले आहेत; मात्र वनविभागाकडून पहाणी केली असता, ठसे मिळाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. नाहक सोशल मीडियावरून पसरणाऱ्या अफवांमुळे घाबरून जाऊ नये, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे.
-----
ज्वारीची कणसं डोलू लागली
मोहोळ : जिल्ह्यात रब्बी ज्वारीची पेरणी उशिरा का होईना झाली. आता थंडीच्या महिन्यात कणसे पोटऱ्यात येऊ लागली आहेत. सर्व शिवार हिरवंगार दिसू लागल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर हासू दिसू लागले आहे. अतिवृष्टीमुळे खरिपानं दगा दिला, तरी रब्बी हंगाम हातचा जाऊ नये, अशी अपेक्षा बळीराजांमधून व्यक्त होऊ लागली आहे.
-----
ऑनलाइन बुकिंग करून विठ्ठलाचे दर्शन
पंढरपूर : कोरोना महामारीमुळे दूर असणाऱ्या भाविकांकडून अगोदर ऑनलाइन बुकिंग करून श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यावर भर दिला आहे. यामध्ये लहान मुलांना आणू नये, असे मंदिर समितीने स्पष्ट केले आहे. भक्तांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत दर्शनास यावे, मंदिर समितीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
-----
गावोगावच्या मंदिरात साधेपणाने दत्त जयंती
सोलापूर : दत्त जयंतीचे औचित्य साधून गावोगावच्या दत्त मंदिरात सामाजिक अंतर राखत, सॅनिटायझर व मास्कचा वापर करून दत्त जयंती साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे होणारी गर्दी यंदा टाळण्यात आल्याचे दिसून आले. वृद्ध मंडळींनी घरी बसूनच मनोमन गुरुदेव दत्ताचे दर्शन घेतले.
------
जत्रा, उत्सव टाळा, घरोघरी भक्तिभाव जपा
सोलापूर : सध्या जत्रा, उत्सवाचा काळ आहे. अनेकांनी हे उत्सव टाळून प्रशासनाला सहकार्य केले आहे. कोरोना महामारीमुळे यंदा सर्वच पारंपरिक सणांवर गदा आली आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाकडून असे निर्बंध घातले आहेत. गावोगावच्या सरपंच, गावकारभाऱ्यांनी लोकांमध्ये जनजागृती करून देवांच्या प्रति घरीच भक्तिभाव जपावा, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
------