सोलापूर दक्षिणमध्ये घटला मतदानाचा टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 11:41 AM2019-10-23T11:41:23+5:302019-10-23T11:43:02+5:30

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ; उमेदवारास फारशी चुरस नसल्याचे जाणवले !

Polling percentage drops in Solapur South | सोलापूर दक्षिणमध्ये घटला मतदानाचा टक्का

सोलापूर दक्षिणमध्ये घटला मतदानाचा टक्का

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाल्याची नोंद ३ लाख १० हजार २७२ पैकी एक लाख ६० हजार ८९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला८८ हजार ७८३ पुरुष तर ७२ हजार ११६ स्त्री मतदारांनी मतदान केले

नारायण चव्हाण

सोलापूर : विधानसभेच्या निवडणुकीत सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात अन्य मतदारसंघाच्या तुलनेत निचांकी मतदानाची नोंद झाली आहे़ पावसाचा फटका मतदानाला बसला असून, उमेदवारात फारशी चुरस नसल्यामुळे मतदान घटल्याची चर्चा आहे.

जिल्ह्याच्या अन्य मतदारसंघापेक्षा सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाल्याची नोंद आहे. सरासरी ५१़८६ टक्के मतदान झाले आहे. ३ लाख १० हजार २७२ पैकी एक लाख ६० हजार ८९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ८८ हजार ७८३ पुरुष तर ७२ हजार ११६ स्त्री मतदारांनी मतदान केले. पुरुष मतदारांची संख्या स्त्रियांपेक्षा अधिक राहिली आहे. गतवेळच्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसून येते.

निवडणुकीत फारशी चुरस नव्हती अशी सुरुवातीपासून मतदारसंघात चर्चा होत राहिली़ साहजिकच कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा निरुत्साह होता. मतदारांना घरातून मतदान केंद्रात आणण्यासाठी राजकीय पक्षांची यंत्रणा अभावानेच दिसली. 

भाजप-सेना -शिवसंग्राम-रिपाइं-रासप महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे बाबा मिस्त्री तथा मौलाली सय्यद, एमआयएमचे अमित अजनाळकर आणि वंचित आघाडीचे युवराज राठोड यांच्यात चौरंगी लढत असली तरी महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारातच खरी चुरस होती. आघाडीचे बाबा मिस्त्री मतदारसंघात नवखे असल्याने त्यांच्यासमोर अनेक अडचणी होत्या़ त्यात काँग्रेसच्याच नेत्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करीत उमेदवाराला अपशकून केल्याचा परिणाम निवडणुकीवर झाला. काँग्रेसमध्ये नाराजी तर राष्ट्रवादी गलितगात्र झाल्याचे प्रचारात स्पष्टपणे जाणवत होते. 

भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांना सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक अखेरच्या टप्प्यात भलतीच रंगतदार वळण घेत राहिली. एकाकी लढणाºया बाबा मिस्त्रींना काँग्रेसच्या श्रेष्ठींनी बळ दिले़ नाराज बाळासाहेब शेळके प्रचारात उतरले़ समर्थकही उघडपणे बाहेर पडले. ग्रामीण भागात बाबा मिस्त्री यांना वोट अन् नोट देऊन प्रचारात रंगत आणली. शेवटच्या टप्प्यात ही लढत ग्रामीण भागात चुरशीची झाली. लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळण्याची अपेक्षा भाजपकडून केली जात होती, मात्र अखेरच्या टप्प्यात असंतुष्ट कार्यकर्ते, पक्षांतर्गत गटबाजी या चर्चेने काँग्रेसच्या गोटात उत्साह संचारल्याचे दिसून आले.

बाबा मिस्त्री शहरी चेहºयाचे, राजकीयदृष्ट्या फारसे परिचित नसल्याने भाजपच्या प्रचारात यांच्याविरोधात प्रभावी मुद्दे मांडता आले नाहीत़ सुभाष देशमुख यांनी पाच वर्षांत केलेल्या विकासकामांवर लक्ष केंद्रित केले़ याउलट मिस्त्रीसह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुभाष देशमुखांना घेरण्याची एकही संधी सोडली नाही. लोकमंगलचा गैरव्यवहार, ऊसबिलाच्या रकमा मिळाल्या नाहीत, खोट्या विकासकामांचा डोलारा उभारला आदी मुद्दे प्रचारात घेऊन देशमुखांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. जातीय समीकरणे मांडली गेली.
सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक ग्रामीण भागात अत्यंत चुरशीची झाली़ गटातटाच्या राजकारणाचे पडसाद प्रचार सभातून उमटले़

नोकरदार, शेतकºयांनी फिरविली पाठ
- पावसामुळे सकाळपासून मतदारांना घराबाहेर पडता येत नव्हते. ११ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती़ त्यानंतर उघडीप मिळाली आणि मतदार घराबाहेर पडले. शहरी मतदारांनी दुपारी मतदान केंद्रे गजबजून गेली तर ज्यांची नावे ग्रामीण भागाच्या मतदार यादीत समाविष्ट होती अशा शहरी मतदारांनी गावांकडे जाण्याचे टाळले़ त्याचा मतदानावर परिणाम झाला. विशेषत: नोकरदार, शेतकरी यांनीच पाठ फिरवली. 

Web Title: Polling percentage drops in Solapur South

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.