आडम मास्तरांसह शेकडो विडी कामगार महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 12:52 IST2021-06-03T12:50:53+5:302021-06-03T12:52:02+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

आडम मास्तरांसह शेकडो विडी कामगार महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात
सोलापूर - विनापरवाना आंदोलन करणार्या माजी आमदार नरसय्या आडम मास्तरांसह शेकडो विडी कामगार महिलांना सोलापूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. विडी व यंत्रमाग कारखाने आणि बाजारपेठा तात्काळ सुरू करा या मागणीसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने गुरूवारी सकाळी सोलापूर महापालिकेच्या प्रवेशव्दाराजवळ आंदोलन करण्यात आले होते.
यावेळी आंदोलनकरांनी शासन, प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. शिवाय वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी महापालिका समोरील रस्ता तात्पुरत्या काळासाठी बंद केला होता. लॉकडाऊन शिथिल करून सोलापूर शहरातील सर्व दुकाने, विडी उद्योग, कारखाने त्वरीत सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार असा इशारा माजी आमदार आडम मास्तरांनी दिला होता, त्यानुसार पोलिसांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्यास परवानगी नसल्याची नोटीस आडम मास्तरांना दिली होती, तरीही आंदोलन केल्याने माजी आमदार नरसय्या आडम मास्तरांसह शेकडो विडी कामगार महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.