जीवनसौंदर्य शब्दातून मांडण्याचे कवीला वेड : अरूणा ढेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 15:00 IST2019-07-29T14:57:10+5:302019-07-29T15:00:56+5:30

सोलापुरात स्व. दत्ता हलसगीकर पुरस्काराने अरूणा ढेरे यांचा केला सन्मान

Poet's craziness: Aruna Dhere | जीवनसौंदर्य शब्दातून मांडण्याचे कवीला वेड : अरूणा ढेरे

जीवनसौंदर्य शब्दातून मांडण्याचे कवीला वेड : अरूणा ढेरे

ठळक मुद्दे- अरूणातार्इंच्या लेखनात खुप प्रांजळपणा आहे - पायगुडे- लोकसाहित्याचं अण्णांनी लावलेलं झाड आता वटवृक्ष झालं आहे - पायगुडे- साहित्यविश्वातील कोणतेच लेखन अरुणातार्इंनी सोडलं नाही - पवार

सोलापूर : कवित्वाचं देणं हे फार थोड्या लोकांना मिळतं. कवीला जीवनाचे सौंदर्य शब्दांतून मांडण्याचे वेड असत़े, पण हे वेड दैवी असते. तो आपली ताकद कवितेतून दाखवत असतो़, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले. 

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जुळे सोलापूर व प्रिसिजन फाउंडेशनच्यावतीने  किर्लोस्कर सभागृह येथे स्व. दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुणे मसापचे कार्यकारी विश्वस्त उल्हास पवार यांच्या हस्ते डॉ. अरुणा ढेरे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले़ या पुरस्काराला उत्तर देताना डॉ. ढेरे बोलत होत्या.

पुढे बोलताना ढेरे म्हणाल्या की, कविता दोन शब्दांच्या मधल्या अंतरामधून जे काही दाखविते ती खरी कविता असते़ जसे रेख आणि रंगामधून काढलेल्या चित्रातून आशय दिसतो किंवा नर्तिकेच्या नृत्याद्वारे जे चित्र आपल्यासमोर उभे राहते तसंच कवितेमधून आलेल्या आशयाचं आपण अर्थ समजून घेणे गरजेचे आहे़ उत्तम गीत हे उत्तम कविता असते़ पण प्रत्येक भावना शब्दांतून मांडता येतेच असे नाही़ कवितेचा फार मोठा वारसा आपल्याला मिळालेला आहे, यात लिहिण्याचे भाग्य मला मिळाले, असे मत डॉ़ अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले़ यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश पायगुडे, उल्हास पवार, सायली जोशी, पद्माकर कुलकर्णी, माधव पवार होते़ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात झाली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पायगुडे म्हणाले, अरुणातार्इंच्या लेखनात खूप प्रांजळपणा आहे़ त्यांच्या वागण्यात साधेपणा आहे़ इतक्या उंचीवर जाऊनही ते नेहमी साधेपणाने राहतात़ असे खूप कमी लोकांना जमते, असे मत त्यांनी व्यक्त केले़  यावेळी उल्हास पवार म्हणाले, लोकसाहित्याचं अण्णांनी लावलेलं झाड आता वटवृक्ष झालं आहे. दु:खाचे स्वागत कऱ़़ असे म्हणणारे ते कवी होते. त्यांच्यातील गुण हे अरुणातार्इंक डे आहेत़ साहित्यविश्वातील कोणतेच लेखन अरुणातार्इंनी सोडलं नाही. सर्वसमावेशक अशी गुणवैशिष्ट्ये त्यांच्याकडे आहेत़़ पूर्वी आम्ही दिवाळी अंकासाठी वाट पाहत असे, पण आता ती ओढ लोेकांमध्ये दिसत नाही़ ही आवड सर्वांमध्ये निर्माण केली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

Web Title: Poet's craziness: Aruna Dhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.