पक्ष राहिले बाजूला; स्थानिक आघाड्यांना आले महत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:18 IST2021-01-09T04:18:28+5:302021-01-09T04:18:28+5:30
अनेक गावांमध्ये स्व. आ. भालके, आ. परिचारक यांचेच दोन-दोन गट, सोबत काळे, विविध संघटना यांना सोबत घेऊन स्वतंत्र पॅनल ...

पक्ष राहिले बाजूला; स्थानिक आघाड्यांना आले महत्त्व
अनेक गावांमध्ये स्व. आ. भालके, आ. परिचारक यांचेच दोन-दोन गट, सोबत काळे, विविध संघटना यांना सोबत घेऊन स्वतंत्र पॅनल उभे केले आहेत. यामध्ये ग्रामस्तरावर आपलेच नेतृत्व किती सक्षम आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न गावागावामध्ये सुरू आहे. सध्या माढा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या ४२ गावांमध्ये आ. बबनराव शिंदे यांनी माझ्या नावावर निवडणुका लढवू नका, असे सांगूनही काही ठिकाणी त्यांच्या नावावर काही कार्यकर्ते ग्रामपंचायत निवडणुकीत उतरले असल्याचे चित्र आहे. याशिवाय स्वाभिमानी, बळीराजा शेतकरी संघटना, विविध पक्षाचे तालुका, जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सोयीच्या आघाड्या करून एकमेकांना शह देण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे.
पक्ष-गटांना तिलांजली
तालुक्यात प्रमुख दोन-तीन गट आहेत. याशिवाय विविध शेतकरी संघटना, सामाजिक संघटना, प्रमुख राजकीय पक्षात काम करणाऱ्यांची संख्या शेकडोच्या घरात आहे. मात्र स्थानिक ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लढविताना कोण कोणत्या गटाचा, कोण कोणत्या पक्षाचे काम करत आहे, हे न पाहता गावातील आपल्या विरोधकाचा काटा काढायचा, या एकाच उद्देशाने, भाव-भावकी, पाहुणे-रावळे याची समीकरणे जुळवत स्थानिक आघाड्या मजबूत झाल्याचे दिसत आहे. यामध्ये प्रमुख पक्ष, गटा-तटांना तिलांजली दिल्याचे दिसत आहे.