Pandurang ... Pandurang! | पांडुरंग...पांडुरंग !
पांडुरंग...पांडुरंग !

असा पांडुरंग जर प्रत्येकाच्या मदतीला धावून आला तर कुणालाही कुणापुढे मदतीसाठी हात पसरायची वेळ येणार नाही.. सकाळी नऊची वेळ राधिका घरातील कामे पटापट उरकून धावपळ करत एकदाचं आॅफिस गाठायच्या प्रयत्नात तिची तयारी सुरू होती. घड्याळातील काटे पुढे-पुढे जात असताना आपण आॅफिसला वेळेत पोहोचतो की नाही, याच विचारात तिने गाडी काढली आणि निघाली. अर्थात गाडी ही नेहमीप्रमाणे वेगातच होती, हळूहळू एक-एक चौक पार करत गाडी मोदीच्या रस्त्याला लागली आणि नेमकी तिथेच ती बंद पडली. पाहिलं गाडीतलं पेट्रोल ड्राय झालं होतं. ‘ताई काय झालं’ मागून आवाज आला! ती पाहते तर काय, मध्यम बांध्याचा सडसडीत कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावलेला, तो अपरिचित होता पण आवाजात आपुलकीची भावना होती. ती म्हणाली काही नाही, पेट्रोल संपले वाटतं. तो जवळ आला, म्हणाला दाखवा गाडी..

तिने आपल्याच तंद्रीत त्याच्याकडे गाडी कधी सुपूर्द केली. आणि म्हणाला थांबा इथेच, लगेच त्याने कुणाला तरी फोन केला. थोड्या वेळाने तेथे एका बाईकवर माणूस रिकामी बाटली घेऊन आला.. तो गृहस्थ त्याच्या गाडीवर बसला, म्हणाला ‘मी पेट्रोल घेऊन येतो’ तिने बॅगमधून पैसे काढण्यासाठी हात घातला, असू द्या ताई आम्ही आणतो नंतर द्या पैसे, ते लगेच निघून गेले. तेवढ्यात ती माणसं गाडीवरून येताना तिला दिसली. ती जरा सावरून उभे राहिली. हातात लगेच गाडीची चावी घेतली ते जवळ आले. रिकामी बाटली दाखवून म्हणाले.. उद्या संप आहे ना आज ते बाटलीत पेट्रोल देणार नाहीत.

गाडीच न्यावी लागेल पेट्रोल पंपावर. तिने काही बोलायच्या आणि सांगायच्या आधीच त्यांनी हात पुढे केला. तिने काहीच विचार न करता चावी आणि पैसे हातात दिले. तो बाईकवर आलेला माणूस तेथून निघून गेला. अरे हे काय तिच्या डोक्यात नकारात्मक विचारांची घोडदौड सुरू व्हायच्या आधीच तो पार लांब गेलेला होता... ‘हे काय केलंस तू... कशाला चावी दिली त्याला... तू ओळखते का त्याला.. कोण होता तो.. ... या नकारघंटेने तिला आता शुद्धीवर आणले. समाजात घडणाºया, वाचनात येणाºया तर कधी कानावर पडणाºया सर्व गोष्टी डोक्यात घुमू लागल्या. तिने घरी फोन केला. ...कोण होता तो ...कुणाला गाडी दिली. एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली ‘अरे हो,.. पण तो माणूस चांगला होता. आॅफिसमधूनही फोन आला आणि विचारणा झाली वारंवार कुणाला त्रास देणं बरं नाही, या भावनेनं ती नको म्हणाली. आणि आता दहा मिनिटे होऊन गेली होती. तिला काळजी वाटू लागली, यांचं म्हणणं खरं तर ठरणार नाही ना. तो साळसूदपणा दाखवून गाडी घेऊन तर नाही गेला ना..?

खरंतर त्याला नाव तरी विचारायला पाहिजे होतं, तेही नाही. मोबाईल परत खणखणू लागला. घरून फोन येऊ लागला तिने घाबरून काही केल्या फोन उचलला नाही. आता तो ज्या रस्त्याने गेला तिकडे तिची पावलं वळू लागली. त्या पेट्रोल पंपाकडे तिची पावले निघाली. ती आता सर्व देवांना प्रार्थना करू लागली. दोनच महिने झाले होते गाडीला.. तेवढ्यात तो गृहस्थ जवळ आला. मॅडम तुमची गाडी. पेट्रोल भरले आहे, पण उद्या संप असल्याने पंपावर खूप गर्दी होती म्हणून उशीर झाला. तोच बिचारा दिलगिरी व्यक्त करू लागला. ती गाडी बघू लागली गाडीचे सर्व पार्ट आहेत ना..? होय गाडी तर व्यवस्थित होती..! . तिने त्याच्याकडून गाडी घेतली त्याला मदतीबद्दल पैसे देऊ केले, त्याने हात जोडले नको ताई, तुम्ही जा आता, तुम्हाला उशीर होत असेल, तिने त्याला त्याचे नाव विचारले. तो म्हणाला, पांडुरंग मिस्त्री ..पांडुरंग.! .खरंच ... अगदी देवासारखा आला हा गृहस्थ. गजबजलेल्या आणि मोबाईलमध्ये व्यस्त असणाºया उच्चभ्रू समजल्या जाणाºया लोकांना कुठे वेळ असतो. खरंच.. असाच पांडुरंग प्रत्येकाच्या हृदयात वसत असला तर किती छान होईल, असं म्हणत गाडी स्टार्ट करीत ती म्हणाली.. पांडुरंग पांडुरंग...!
- ईशा वनेरकर 


Web Title: Pandurang ... Pandurang!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.