पंढरीचा वारकरी ; संप्रदायाचे वैभवही मानले जाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 15:02 IST2018-07-20T15:02:27+5:302018-07-20T15:02:50+5:30

पंढरीचा वारकरी ; संप्रदायाचे वैभवही मानले जाते
आनंदानुभूतीसाठी आणि प्रतिक्षणी वर्धमान होणाºया भक्तिसुखाच्या सेवनासाठी तसेच तो भक्तिरस सर्वांना देण्यासाठी सर्व क्षेत्रांतून संतांच्या पालख्या श्रीक्षेत्र पंढरपूरकडे येतात. जगद्कल्याणाची तळमळ घेऊन ही मांदियाळी अविरत आनंदाचा वर्षाव करीत आली आहे, करीत आहे. त्यामुळे हीच खरी वारी आहे. वारी म्हणजे सर्व संतांचे स्नेहमिलन, समष्टीकल्याणाची भगवंताकडे केलेली प्रार्थना आहे, उपासकांनाच नव्हे तर उपास्यालाही भावविभोर करणारी सर्व जनसुलभ अशी साधना आहे. वारकरी संप्रदायाचे हे वैशिष्ट्यच आहे की, येथे सर्वांना सर्व मिळण्याची व्यवस्था आहे.
‘यारे यारे लहान-थोर। यातीभलते नारीनर।
करावा विचार। न लगे चिंता कोणासी।।’
असे उद्गार तुकाराम महाराजांनीच काढले आहे. त्यामुळे जात-पात, धर्म-पंथ वगैरे भेद बाजूला ठेवून सर्व जण येथे येतात. आणि सर्व विसरून एका आनंदामध्ये सुस्नान होत राहतात. हाच अनुभव वारीमध्ये अपेक्षित आहे आणि हेच संप्रदायाचे वैभवही मानले जाते. संत श्रीतुकाराम महाराजांनी हा अनुभव व्यक्त करताना म्हटले आहे,
‘वर्णाभिमान विसरली याति।
एकएका लागतील पायी रे।।’
म्हणूनच समाजातील सर्व घटक येथे एकोप्याने, समभावाने नांदतात, आनंद घेतात. येथे नामदेव महाराज, नरहरी महाराज, सावता महाराज, गोरोबा काका, रोहिदास महाराज असे विभिन्ना जातींत अवताराला आलेले संत एकत्र येतात. त्यांचे प्रवृत्तीधर्म, कार्य भिन्न असले तरीही येणाºया पारमार्थिक अनुभूतीमध्ये तरतमभाव नाही. सर्वांचा अनुभव एकच आहे आणि समाजकल्याणाची तळमळ सारख्याच तीव्रतेची आहे.
- सुधाकर इंगळे महाराज