सोलापूरचे ४७ नागरिक पहलगामच्या हॉटेलमध्ये सुरक्षित; पर्यटकांना परत आणण्यासाठी विमान जाणार
By आप्पासाहेब पाटील | Updated: April 23, 2025 12:19 IST2025-04-23T12:18:31+5:302025-04-23T12:19:36+5:30
Pahalgam Terror Attack: जम्मू कश्मीर येथील पहलगाम येथील पर्यटकावर दहशतवाद्यांनी २२ एप्रिल २०२५ रोजी हल्ला केला. यामध्ये मृत्यू झालेल्या किंवा जखमी असलेल्या नागरिकांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील नागरिक नाहीत. सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यातील ४७ नागरिक श्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत.

सोलापूरचे ४७ नागरिक पहलगामच्या हॉटेलमध्ये सुरक्षित; पर्यटकांना परत आणण्यासाठी विमान जाणार
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - जम्मू कश्मीर येथील पहलगाम येथील पर्यटकावर दहशतवाद्यांनी २२ एप्रिल २०२५ रोजी हल्ला केला. यामध्ये मृत्यू झालेल्या किंवा जखमी असलेल्या नागरिकांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील नागरिक नाहीत. सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यातील ४७ नागरिक श्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत. जिल्ह्यातील आणखी काही नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले आहेत किंवा नाही याविषयीची माहिती टुरिस्ट कंपन्यांशी संपर्क करून प्रशासन घेत आहे. तरी जम्मू कश्मीर मध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाची त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
जम्मू कश्मीर मध्ये सोलापूर जिल्ह्यातील पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व तहसीलदार व प्रांताधिकारी यांची सकाळी बैठक घेऊन गाव निहाय पर्यटकांच्या याद्या करण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच तालुकास्तरावरील टुरिस्ट ऑपरेटर त्यांच्या संपर्कात राहून पर्यटकांची नावे घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रशासन जिल्हास्तरावरील सर्व टुरिस्ट कंपन्यांच्या संपर्कात असून त्यांच्याकडून जिल्ह्यातील पर्यटकांचे नावे घेण्यात येत आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत संपर्क क्रमांक देण्यात आलेले असून जम्मू कश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर प्रशासनाला माहिती द्यावी. प्रशासनाच्या वतीने सर्व पर्यटकांना सहकार्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. तसेच सद्यस्थितीत मिळालेल्या माहितीप्रमाणे, सोलापूर जिल्ह्यातील ४७ पर्यटक श्रीनगर येथे सुरक्षित असल्याची माहिती मिळाली असून ते पर्यटक एकत्रित एका हॉटेलवर थांबलेले आहेत. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या किंवा जखमी असलेल्या पर्यटकांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील नागरिक नाहीत त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून तसेच ज्यांचे नातेवाईक जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेले आहेत अशा नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाला संपर्क करावा व त्यांची माहिती उपलब्ध करून द्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
पिंपळनेरचे लोक हॉटेलमध्ये सुरक्षित...
माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील सरपंच राहुल पेटकर हे ४७ नागरिकांसोबत श्रीनगर येथे एका हॉटेलमध्ये थांबलेले असून पेटकर यांच्याशी तसेच पोलीस पाटील यांच्याशी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून त्यांच्या व सोबतच्या सर्व नागरिकांच्या सुरक्षेची माहिती घेतली तसेच त्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक असलेले सर्व सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आलेले आहे.