सोलापूरातील पद्मशाली संस्था निवडणुक ; दोन गटांनी नेमले वेगवेगळे अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:57 PM2018-06-25T12:57:51+5:302018-06-25T13:02:49+5:30

पद्मशाली ज्ञाती संस्थेतील वाद शिगेला: कोठेंची निवड; नंतर दुसºया गटाने फलमारींचे नाव जाहीर केले

Padmashali institution in Solapur; Different heads appointed by two groups | सोलापूरातील पद्मशाली संस्था निवडणुक ; दोन गटांनी नेमले वेगवेगळे अध्यक्ष

सोलापूरातील पद्मशाली संस्था निवडणुक ; दोन गटांनी नेमले वेगवेगळे अध्यक्ष

Next
ठळक मुद्दे१९५४ साली पद्मशाली ज्ञाती संस्थेची अधिकृत नोंदणीकोठेंनी शब्द पाळला नाही : फलमारीपद्मशाली ज्ञाती संस्थेच्या निवडणुकीत ६६ वर्षांनंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात गदारोळ

सोलापूर : मार्कंडेय मंदिरात रविवारी झालेली पद्मशाली ज्ञाती संस्थेची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गोंधळ आणि गदारोळाने जोरदार गाजली. समाजाच्या इतिहासात प्रथमच दोन अध्यक्षांची निवड करण्यात आली. दिवसभर गदारोळ आणि आरोप-प्रत्यारोपाने सुरू असलेल्या सभेत दुपारी ४ वाजता पाच विश्वस्तांनी महेश कोठे यांची अध्यक्षपदी निवड घोषित केली. लगेचच अर्ध्या तासाने दुसºया गटाने मागच्या कार्यकारिणीत सरचिटणीस असलेल्या सुरेश फलमारी यांची अध्यक्षपदी निवड जाहीर केली.

दर तीन वर्षांनी पद्मशाली ज्ञाती संस्थेची नवीन कार्यकारिणी जाहीर होत असते. मागच्या कार्यकारिणीची मुदत संपल्याने नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी रविवारी पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने मार्कंडेय मंदिरात सर्वसाधारण सभा घेण्यात आली. ही सभा घेण्याआधी समाजातील काही कार्यकर्त्यांना घेऊन कोठेंनी पुन्हा अध्यक्ष होण्यासाठी फिल्डिंग लावल्याची कुणकुण लागल्यामुळे त्यांनी उघडपणे त्यांच्या अध्यक्षपदास विरोध केला होता. यामुळे निवडीची सभा वादळी ठरणार आहे हे आधीच स्पष्ट झाले होते.

सकाळी ११ वाजता सभेचे कामकाज सुरू झाले. प्रारंभी मागील तीन वर्षांच्या अहवालाचे वाचन करण्यात आले. यानंतर अध्यक्षपदाच्या निवडीसाठी प्रक्रिया सुरू झाली. गेल्या अनेक वर्षांपासून पद्मशाली ज्ञाती संस्थेत एकापेक्षा अनेक जण इच्छुक असल्यास उपस्थित ज्येष्ठांमधील पाच जणांची पंच म्हणून निवड करायची आणि त्यांनी नवा अध्यक्ष निवडायचा अशी परंपरा आहे. त्यानुसार सुरुवातीला पाच जणांची नावे जाहीर करण्यास कोठे यांनी सुरुवात केली. यातील सत्यनारायण बोल्ली यांचे नाव सोडले तर इतर सर्व नावांना उपस्थित व्यंकटेश कोंडी, राजेंद्र कट्टा, व्यंकटेश पडाल, जनार्दन कारमपुरी यांनी विरोध केला. 

विरोधानंतर कोठे यांनी उपस्थितांनी नावे द्यावीत, अशी सूचना केली. उपस्थितांकडून नावे मागवून घेतल्यानंतर विद्यमान पदाधिकारी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. या चर्चेनंतर नव्याने सत्यनारायण बोल्ली, पुरूषोत्तम उडता, श्रीनिवास क्यातम, मल्लिकार्जुन कमटम, नागनाथ मुदगुंडी या पाच जणांची पंच म्हणून निवड करण्यात आली. या पाच जणांनी नवीन कार्यकारिणी नेमावी, असे बैठकीत ठरले. दरम्यान, या निर्णयालाही उपस्थितांनी जोरदार विरोध केला. प्रचंड गदारोळानंतर या पंचांनी मुरलीधर आरकाल, रामकृष्ण कोंड्याल, रामचंद्र जन्नू, जनार्दन कारमपुरी, नरसप्पा इप्पाकायल या पाच जणांची निवड केली. या पाच विश्वस्तांनी अध्यक्षपदासाठी पुन्हा चर्चा सुरू केली. या पदासाठी महेश कोठे, सुरेश फलमारी, बालराज बोल्ली, भूपती कमटम, मनोहर इगे हे पाच जण इच्छुक होते. यापैकी प्रबळ दावेदार महेश कोठे आणि सुरेश फलमारी हे दोघे होते. दोघांनीही अध्यक्षपदासाठी आग्रह धरल्यावर दोघांना दीड-दीड वर्ष देण्याचा नवा ‘फॉर्म्युला’ विश्वस्तांनी समोर आणला.

महेश कोठे यांनी येणाºया विधानसभा निवडणुकीत मला आमदार व्हायचे आहे. सुरुवातीचे दीड वर्ष मला मिळावे, अशी भूमिका घेतली. याला सुरेश फलमारी यांनी विरोध करीत सुरुवातीचे दीड वर्ष मला द्या, नंतर तुम्ही व्हा, असा पवित्रा घेतला. दोन्ही दावेदार आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने प्रचंड गदारोळात विश्वस्तांनी महेश कोठे यांची अध्यक्षपदी निवड जाहीर केली. हा निर्णय मान्य नसल्याचे फलमारी समर्थक पांडुरंग दिड्डी, अशोक इंंदापुरे, विजय नक्का यांनी सांगून सभात्याग केला. त्यानंतर अर्ध्या तासाने त्याच ठिकाणी दुसºया गटाने बैठक घेऊन सुरेश फलमारी यांची अध्यक्षपदी निवड जाहीर करून जय मार्कंडेयच्या घोषणा दिल्या.

शिक्षण संस्थेतील गैरव्यवहार लपविण्यासाठी मला विरोध
दशरथ गोप यांच्यावर साधला निशाणा : माझीच निवड कायदेशीर : महेश कोठे 
पद्मशाली शिक्षण संस्थेची निवडणूक तीन महिन्यांवर आली आहे. या निवडणुकीत मी लक्ष घातले तर यांची दुकानदारी बंद पडेल, या भीतीने माझ्या अध्यक्षपदाला काही असंतुष्टांनी विरोध केला आहे. याच लोकांनी मागील विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात काम केले. या मंडळींनी आजच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घडवून आणला असून, ‘झारीतले शुक्राचार्य’ कोण आहेत, हे मला माहीत आहे. संस्थेच्या परंपरेप्रमाणे पाच पंच आणि पाच विश्वस्त यांनी माझी निवड जाहीर केल्यामुळे कायदेशीर अध्यक्ष मीच आहे, असे महेश कोठे यांनी सायंकाळी मार्कंडेय मंदिरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या निवडणुकीत ६६ वर्षांनंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला. दोन गटांनी दोन वेगवेगळे अध्यक्ष नेमले. यानंतर कोठे यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन माझी निवड कायदेशीर असून, पाच पंच आणि पाच विश्वस्तांची स्वाक्षरी असलेले पत्र आणि निवड केल्याची चित्रफीत माध्यमांना दाखविली. असे पत्र किंवा चित्रफीत विरोधी गटांनी दाखवावे, असे आव्हान त्यांंनी फलमारी गटाला उद्देशून केले.

ही सर्वसाधारण सभा इतरत्रही घेता आली असती, परंतु भगवान मार्कंडेय यांच्यासमोर सर्व खरे-खोटे व्हावे यासाठी मंदिरात घेतली. या ठिकाणीही काही जणांनी खोटे-नाटे आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. सुरेश फलमारी यांनी आमच्यासमवेत मागील तीन वर्षे काम केले आहे. कुणाच्या तरी ऐकण्यावरून त्यांनी हा प्रकार केला असल्याचेही कोठे म्हणाले. 
पद्मशाली शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. तिकडे मी लक्ष देऊ नये म्हणून दशरथ गोप आणि त्यांच्या काही सहकाºयांनी माझी अध्यक्षपदी निवड होऊ नये यासाठी फिल्डिंग लावली होती. परंतु गेल्या तीन वर्षात मी केलेले काम पाहून पुन्हा माझी निवड करण्यात आली आहे, असेही महेश कोठे म्हणाले.

कोठेंनी शब्द पाळला नाही : फलमारी
- महेश कोठे यांनी मला पुढच्या टर्मला अध्यक्ष करू, असा शब्द दिला होता. तो त्यांनी पाळला नाही. गेली ४० वर्षे झाली मी समाजाचे काम करतो. समाजाच्या प्रत्येक घटकाशी माझा त्यांच्या आधीपासून संबंध आहे. आधी नाही म्हणून अचानक आपल्या समर्थकांना सभेत ‘पेरून’ त्यांनी अध्यक्षपद मिळविले आहे. दीड-दीड वर्ष अध्यक्ष होण्याचा प्रस्ताव आल्यानंतर मी पहिली टर्म मागितली. याला कोठे यांनी विरोध करून बेकायदेशीरपणे स्वत:ची निवड करवून घेतल्याचे सुरेश फलमारी यांनी सांगितले.

फलमारी समर्थक
- विजय नक्का, व्यंकटेश आकेन, अशोक इंदापुरे, पांडुरंग दिड्डी, विजय चिप्पा, अनिल वासम, अशोक बल्ला, श्रीधर चिट्याल, काशिनाथ गड्डम, मल्लिकार्जुन सरगम, मुरलीधर सुंचू, महांकाळ येलदी, विजयकुमार गुल्लापल्ली, अंबादास अमृतम, राजेंद्र कट्टा, श्रीनिवास यन्नम, बाबू श्रीराम, राकेश पुंजाल, रविकुमार परकीपंडला, रविकुमार गुत्तीकोंडा, महेश सोमा, विजय मद्दा, प्रशांत कुडक्याल, लक्ष्मीकांत सरगम.

सचिव पदाचा शब्द दिला होता !
- सुरेश फलमारी यांना तीन वर्षे सचिवपदी नेमण्याचा शब्द दिला होता. अध्यक्षपदाचा नाही. त्यांच्या समर्थकांविषयी बोलताना कोठे म्हणाले की, अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी येथे येऊन समाजातील ज्येष्ठांशी चर्चा करावी, यातून जो तोडगा किंवा जो निर्णय विश्वस्त घेतील तो मला कधीही मान्य राहील. 

६६ वर्षांत पहिल्यांदाच!
- १९५४ साली पद्मशाली ज्ञाती संस्थेची अधिकृत नोंदणी झाली. ६६ वर्षांत सर्वसंमतीने अध्यक्षासह कार्यकारिणी नेमायची पद्धत होती. यावेळी मात्र परंपरेला सुरूंग लागला. एकमत तर झालेच नाही. पण ज्ञाती संस्थेत चक्क दोन गट पडले. दुसºया गटाने आपला अध्यक्ष भगवान मार्कंडेयांच्या साक्षीने नेमला़असा प्रकार गेल्या ६६ वर्षांत प्रथमच घडला असल्याचे काही जाणकारांनी सांगितले.

Web Title: Padmashali institution in Solapur; Different heads appointed by two groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.