Organ donation | अवयवदान श्रेष्ठदान
अवयवदान श्रेष्ठदान

ठळक मुद्देसबंध भारतात १३ आॅगस्ट अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातोकिडनी, डोळे या अवयवदानाबरोबरच आजकाल हृदय अवयवदानाची चळवळ वेग घेत आहे१९६७ साली साऊथ आफ्रिकेमध्ये ख्रिश्चन बर्नाड यांनी पहिले यशस्वी एका मनुष्यामधील हृदय दुसºया मनुष्यामध्ये प्रत्यारोपित केले

सबंध भारतात १३ आॅगस्ट अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो. अवयवदान ही एक काळाची गरज आहे. किडनी, डोळे या अवयवदानाबरोबरच आजकाल हृदय अवयवदानाची चळवळ वेग घेत आहे. १९६७ साली साऊथ आफ्रिकेमध्ये ख्रिश्चन बर्नाड यांनी पहिले यशस्वी एका मनुष्यामधील हृदय दुसºया मनुष्यामध्ये प्रत्यारोपित केले. परंतु या प्रक्रियेमध्ये होणाºया मृत्यूमुळे ही चळवळ नंतर संथ झाली. १९८० साली हृदय प्रत्यारोपण झाल्यानंतर शरीर त्याला नाकारू नये म्हणून औषधांचे शोध लागले आणि त्यानंतर या चळवळीने वेग पकडला. भारतामध्ये डॉ. वेणुगोपाल यांनी पहिले हृदय प्रत्यारोपण दिल्ली येथे एम्स हॉस्पिटलमध्ये १९९४ साली केले. 
जगामध्ये वर्षाला जवळपास तीन हजार लोकांना हृदय प्रत्यारोपण सध्या केले जाते. हृदय प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेमध्ये साधारण आॅपरेशन झाल्यानंतर एक वर्ष जगण्याची मर्यादा ८० टक्के लोकांमध्ये असते. हृदय प्रत्यारोपण झालेले ५० टक्के रुग्ण १० वर्षे व्यवस्थित जगू शकतात. 

काही रुग्णांमध्ये जन्मजात हृदयरोग असतात. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक असल्यामुळे हृदय निकामी झाले असेल तर हृदय प्रत्यारोपणाचा विचार केला जातो. या ठिकाणी विशेष गोष्ट जी सर्वांनी लक्षात ठेवायची आहे की सर्वांनाच हृदय प्रत्यारोपण करता येत नाही. ज्या रुग्णांचे हृदय कमजोर झाले आहे आणि त्यांना औषधांचा त्याचबरोबर आॅपरेशनचा त्यांच्या हृदयात दुरुस्ती करण्याचा दुसरा काहीही पर्याय उपलब्ध नसेल आणि रुग्णाचे आयुष्य एक वर्षापेक्षा कमी राहिले असेल तरच हृदय प्रत्यारोपणाचा विचार केला जाऊ शकतो. कारण ही प्रक्रिया खूप खर्चिक आहे आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा मृत्यू होण्याचा दर खूप जास्त असतो. 

हृदयदान करायचे असते त्यांच्या नातेवाईकांनी पेशंटचा ब्रेन डेथ झाला असेल, मेंदू पूर्णपणे निष्क्रिय झाला असेल आणि त्यांनी संमती दिली तरच हृदयदान करता येते. पेशंटचे हृदय पहिल्यांदा तपासले जाते. वय ५५ वर्षांपेक्षा कमी हृदयाचे काम ४५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल रक्तदाब व्यवस्थित असेल आणि हृदयदात्याला कुठल्याही प्रकारचे जंतुसंसर्ग कॅन्सर किंवा हृदयाचा काही दुसरा आजार नसेल तर असे हृदय हृदयदान म्हणून घेता येते. ज्या रुग्णाला हृदय द्यायचं आहे आणि ज्याचे हृदय घ्यायचे आहे अशा दोन्ही लोकांचा रक्तगट आणि शरीराचे आकारमान मिळते-जुळते असणे गरजेचे आहे. जर रक्तगट आणि शरीर आकारमान जुळत नसेल तर अशी प्रक्रिया करता येत नाही. हृदय दान झाल्यानंतर एका विशिष्ट थंड बॉक्समध्ये आणि एका विशेष द्रव्यामध्ये हृदय ठेवून पाठवले जाते.

आजकाल हृदय काढल्यानंतर ते एका मशीनला जोडून लगेचच हृदय शरीराच्या बाहेरही पंपिंग करत दुसºया ठिकाणी पाठवता येते. त्यामुळे हा मधला जाणारा वेळ बारा तासांपर्यंत वाढवता येतो. मिळालेले हृदय चांगले असेल तर ज्या रुग्णाच्या शरीरामध्ये ते लावायचे आहे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली जाते. छाती खोलून त्या रुग्णाचे हृदय पहिल्यांदा बाहेर काढले जाते आणि या वेळांमध्ये रक्ताभिसरण मशीनद्वारे चालू ठेवले जाते. हृदयाचे कप्पे हृदयाच्या नसा जोडल्या जातात आणि त्यानंतर हृदय चालू होण्याची वाट पाहिली जाते. अशाप्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये साधारणत: ८० ते ९० टक्के यशाचे प्रमाण आहे. 

आॅपरेशन यशस्वी झाल्यानंतर साधारणत: तीन आठवड्यांपर्यंत हॉस्पिटलमध्ये ठेवले जाते. या काळामध्ये नवीन बसवलेले हृदय रुग्णाचे शरीर नाकारू नये म्हणून प्रतिकारशक्ती कमी करण्याचे औषध दिले जातात. या काळामध्ये पेशंटला जंतुसंसर्ग होण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे रुग्णाला लोकांपासून वेगळे सुरक्षित ठेवले जाते. ज्यांना आयुष्यामध्ये काहीही आशा राहिलेली नाही, हृदय कमजोर झाले आहे, अशा रुग्णांसाठी हृदयदान किंवा प्रत्यारोपण हे वरदान ठरले आहे. या आॅपरेशनसाठी लागणारी रक्कम वीस ते पस्तीस लाखांपर्यंत आहे. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे हृदय प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेनंतर आजपर्यंत सर्वात जास्त जगलेल्या इंग्लंडमधील एका व्यक्तीचे आयुष्य बत्तीस वर्षांनी वाढले. मृत्यू समोर दिसत असताना मृत्यूच्या जबड्यातून परत येऊन नवीन हृदयाने तेवढे मोठे आयुष्य हे खरोखर निसर्गाचा चमत्कार आहे 
- डॉ. विजय अंधारे   
(लेखक हृदय शल्यविशारद आहेत)


Web Title: Organ donation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.