बुद्ध पौर्णिमेच्या रात्री नान्नज अभयारण्यात दिसला माळढोक
By शीतलकुमार कांबळे | Updated: May 23, 2024 18:59 IST2024-05-23T18:59:21+5:302024-05-23T18:59:35+5:30
बुद्ध पौर्णिमेच्या रात्री नान्नज अभयारण्यात वन्यप्राणी गणना करण्यात आली.

बुद्ध पौर्णिमेच्या रात्री नान्नज अभयारण्यात दिसला माळढोक
सोलापूर : बुद्ध पौर्णिमेच्या रात्री नान्नज अभयारण्यात वन्यप्राणी गणना करण्यात आली. या गणनेत सोलापूरची ओळख असलेला माळढोक पक्षी आढळला. हा पक्षी आढळल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. माळढोक सोबतच कुदळ्या पक्षी दिसला असून नीलगायींची संख्येतही वाढ झाली आहे.
यंदाच्या वर्षीचे वैशिष्ट म्हणजे यावेळी माळढोक तर दिसलाच सोबतच २१ कुदळ्या पक्षी दिसून आले. मागील वर्षी ४ नीलगायी होत्या, त्यात आता वाढ झाली असून त्यांची संख्या ६ झाली आहे. लांडगा, मुंगुस, ससा, सायाळ, घोरपड यांची संख्या कमी दिसली. तर खोकड, रानमांजर, रानडुक्कर, कोल्हा मोर, निलगाय व काळवीट यांच्या संख्येत वाढ झाल्याचे आढळले. गणनेत एकूण १४ प्रकारचे प्राणी व पक्षी आढळले. त्यांची एकूण संख्या ही ७५७ इतकी दिसून आली.
गणनेत आढळलेले पक्षी व प्राणी
लांडगा - ८, खोकड - १३, मुंगुस - ५, रानमांजर ६, ससा - १८, रानडुक्कर - २४९, सायाळ - १, माळढोक १, कोल्हा - ४, घोरपड - २, मोर - ६१, कुदळ्या - २१, नीलगाय - ६, काळवीट - ३६२.