'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 16:08 IST2025-12-19T16:04:19+5:302025-12-19T16:08:41+5:30
Subhash Deshmukh Dilip Mane joined bjp: दिलीप माने यांच्या प्रवेशाला प्रचंड विरोध झाला. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. भाजपने प्रवेश थांबवला. पण, महापालिकेच्या निवडणुका जाहीर होताच मानेंचा प्रवेश करुन घेण्यात आला.

'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
भाजप कार्यकर्त्यांचा दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला आणि महापालिकेतील उमेदवारीच्या भागीदाराला विरोध होता. आता पक्षाने प्रवेश दिला. मतदार काय ते ठरवतील, असा इशारा आमदार सुभाष देशमुख यांनी दिला.
आमदार देशमुख म्हणाले, माने यांच्या पक्षप्रवेशाच्या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बुधवारी रात्री बोलणे झाले. कार्यकर्त्याकडे नागरिकांनी या प्रवेशाबद्दल नकारात्मक भावना व्यक्त केली आहे.
फडणवीसांनी मला चव्हाणांशी बोलायला सांगितले
त्यांना प्रवेश देऊ नये. आमच्यात भागीदार आणू नका, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. ही गोष्ट मी फडणवीस यांच्या कानावर घातली. आमच्यात चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत बोलायला सांगितले. मी गुरुवारी सकाळी रवींद्र चव्हाण यांच्यासोबत बोललो. नागरिकांची नकारात्मक भावना असल्याचे त्यांच्याही कानावर घातले', असेही देशमुख यांनी सांगितले.
पक्षप्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी दिली जाणार नाही हे मी आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे, असे रवींद्र चव्हाण म्हणाले. उमेदवारी देणार नसाल तर पक्षप्रवेश कशासाठी करताय, असे मी त्यांना विचारले. यावर प्रदेशाध्यक्षांनी तुमचा निरोप मुख्यमंत्र्यांना कळवितो, असे सांगितले. यानंतर तासाभरात प्रवेश झाल्याचे माध्यमांकडून कळले.
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष शब्द पाळतील असे वाटते
तुमचा विरोध डावलून पक्षप्रवेश झाला. आता माने गटाला उमेदवारी न देण्याचा शब्द कसा पाळला जाईल, या प्रश्नावर देशमुख म्हणाले, नेतृत्वावर नाईलाजाने का होईना विश्वास ठेवावा लागतो. नेतृत्वाने शब्द दिलेला आहे. ते शब्द पाळतील असे वाटते.
फिडबॅक चुकीचा जात असावा
देशमुख म्हणाले, पक्षाला शहरातून चुकीचा फिडबॅक जात असावा. २०१४ साली मतदारसंघात एकही नगरसेवक, पंचायत समिती सदस्य नसताना निवडून आलो. पुन्हा पंचायत समितीचा सभापती भाजपचा झाला.
माने लोकांना वळविण्यात पटाईत
दिलीप माने लोकांना आपल्या बाजूने वळविण्यात पटाईत आहेत. मागील बाजार समिती निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख यांना आपल्या बाजूने वळविले. यंदाच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना वळवले, असा टोलाही त्यांनी लगावला.