एमआयडीसीसंबंधी उद्योजकांच्या फायलींवर आता सोलापुरातच निवाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 10:58 AM2020-01-31T10:58:53+5:302020-01-31T11:01:05+5:30

उद्योग सचिव सकारात्मक; एरिया मॅनेजरला मिळणार विशेष अधिकार, मंत्रालयातील बैठकीत दिले आश्वासन

Now file for MIDC entrepreneur files in Solapur | एमआयडीसीसंबंधी उद्योजकांच्या फायलींवर आता सोलापुरातच निवाडा

एमआयडीसीसंबंधी उद्योजकांच्या फायलींवर आता सोलापुरातच निवाडा

Next
ठळक मुद्देउद्योजकांच्या प्रश्नी आ. प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून उद्योग सचिवांकडे नुकतीच मंत्रालयात विशेष बैठक उद्योगाच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर सचिवांनी असोसिएशनच्या पदाधिकाºयांशी संवाद साधलाविशेष म्हणजे एमआयडीसीमधील उद्योजकांच्या अडचणींवर ‘लोकमत’ने प्रकाश टाकला

सोलापूर : सोलापुरात एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय नसल्याने येथील उद्योजकांची मोठी अडचण होत आहे़ याबाबत सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनकडून उद्योग विभागाकडे वारंवार पाठपुरावा सुरू आहे़ उद्योग सचिव भूषण गगरानी यांनी सोलापुरात एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय होण्यास पॉझिटिव्ह मत व्यक्त केले.

 प्रादेशिक कार्यालय होईपर्यंत येथील उद्योजकांना पुन्हा सांगलीला येण्याची गरज नाही़ येथील फायलींवर सोलापुरातच निवाडा करता येईल़ त्याकरिता सोलापुरात रिक्त असलेले एरिया मॅनेजरपद लवकरच नियुक्त करण्यात येईल. तसेच एरिया मॅनेजरला याबाबत विशेष अधिकार देण्यात येतील, असे आश्वासनही सचिवांनी दिले.

 सोलापुरात एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापन कार्यालय आहे़ या कार्यालयात एरिया मॅनेजर अर्थात क्षेत्र व्यवस्थापकपद कार्यरत आहे़ गेल्या अनेक महिन्यांपासून सदर पद रिक्त आहे़ येथे कुणीच अधिकारी कार्यरत नाही़ त्यामुळे येथील उद्योजकांच्या अडचणीत वाढ होत आहे़ सोलापुरात एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय व्हावे, तसेच उद्योजकांच्या विविध प्रश्नांचे निवेदन उद्योग सचिवांना देण्यात आले़ पुढील महिनाभरात सोलापुरात नवीन एरिया मॅनेजरची नियुक्ती करण्यात येईल आणि एरिया मॅनेजरलाच सर्व अधिकार देण्यात येतील़ उद्योग सचिवांच्या म्हणण्यानुसार तसे झाल्यास आता यापुढे येथील उद्योजकांना सांगलीला जाण्याची आवश्यकता राहणार नाही़ येथील उद्योजकांना मोठा दिलासा मिळेल, असे सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनला वाटते़ उद्योजकांच्या प्रश्नी आ. प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून उद्योग सचिवांकडे नुकतीच मंत्रालयात विशेष बैठक झाली.

उद्योगाच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर सचिवांनी असोसिएशनच्या पदाधिकाºयांशी संवाद साधला. विशेष म्हणजे एमआयडीसीमधील उद्योजकांच्या अडचणींवर ‘लोकमत’ने प्रकाश टाकला. ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेची उद्योग क्षेत्रात खूप चर्चा झाली़ याची दखल उद्योग विभागानेही घेतली़ मंत्रालयात झालेल्या बैठकीत असोसिएशनचे सचिव गणेश सुत्रावे, खजिनदार वासुदेव बंग तसेच एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

एमआयडीसीमधील जागा खरेदी-विक्री संबंधित ट्रान्स्फर केस असल्यास किंवा त्रिपक्षीय करार, वारसदारांची नावे नोंदवणे, पार्टनर चेंज करणे, उत्पादन प्रक्रिया बदलण्याची प्रक्रिया एमआयडीसी सांगली कार्यालयामार्फत चालते़ एका प्रकरणाकरिता उद्योजकांना अनेकदा सांगली दौरा करावा लागतो़ चिरीमिरी हातात टेकवल्याशिवाय एमआयडीसीत कामे होत नाहीत, अशी ओरड उद्योजकांची आहे़ एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय सोलापुरात झाल्यास बाहेरचे उद्योजक सोलापुरात यायला उत्सुक असतील़ आता उद्योजक सोलापुरात यायला घाबरत आहेत, असेही उद्योजकांनी बैठकीत सांगितले.

चिंचोळी येथील सीएफसीमध्ये होईल निवाडा
- चिंचोळी एमआयडीसी येथील कॉमन फॅसिलिटी सेंटर अर्थात सीएफसीमध्ये जागा उपलब्ध आहे़ हे मध्यवर्ती ठिकाण आहे़ त्यामुळे सर्व उद्योजकांना सोईस्कर होईल़ एमआयडीसीचे एरिया मॅनेजर येथे बसून प्रलंबित प्रकरणांवर निवाडा देतील़ याबाबत लवकरच पत्रक काढून येणाºया नूतन एरिया मॅनेजरला सूचना देऊ, असेही उद्योग सचिवांनी यावेळी सांगितले़

एमआयडीसीच्या प्रश्नांसंदर्भात वारंवार सांगलीला जाणे सोलापूरकर उद्योजकांना परवडणार नाही़ त्यामुळे सोलापुरात एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय व्हावे, याकरिता उद्योग विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे़ याबाबत उद्योग सचिव सकारात्मक आहेत़ परवा झालेल्या बैठकीत त्यांनी येथील उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले़
-राम रेड्डी
उपाध्यक्ष, सोलापूर इंडस्ट्रीज असो़, सोलापूऱ

Web Title: Now file for MIDC entrepreneur files in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.