Solapur BJP ( Marathi News ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात होणार आहे. या शपथविधीसाठी विविध जिल्ह्यांतील आमदारांना पक्षनेतृत्वाकडून फोन करण्यात आले आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असताना यापैकी एकाही आमदाराला मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून फोन गेला नसल्याचे समजते.
भाजपचे आमदार सुभाष देशमुख वगळता भाजपचे इतर चार आमदार आज अधिवेशनासाठी नागपुरात हजर राहणार आहेत. राज्य सरकारमध्ये गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील आमदाराला मंत्रिपद मिळालेले नाही. महायुती सरकारमध्ये मंत्रिपदासाठी आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची नावे चर्चेत होती. आमदार समाधान आवताडे यांच्यासाठी मुंबईतील मित्रांनी फिल्डिंग लावल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिपदासाठी निवड झालेल्या आमदारांना फोन करतील, असे वृत्त शनिवारी आले होते. भाजप आमदारांचे निकटवर्तीय लोक मुख्यमंत्री कार्यालयातील फोनच्या प्रतीक्षेत असल्याचे शनिवारी पाहायला मिळाले.
आमदार सुभाष देशमुख शनिवारी दिवसभर लोकमंगल प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या नियोजनात व्यस्त होते. आमदार विजयकुमार देशमुख मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावत होते. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे नाव दिवसभर सर्वाधिक चर्चेत होते. ते सुद्धा अक्कलकोट शहरातील एका कार्यक्रमात व्यस्त होते. आमदार समाधान आवताडे यांचीही मतदारसंघातील कामांची लगबग सुरु होती. आमदार देवेंद्र कोठे यांनीही दत्तजयंतीनिमित्त अक्कलकोटचा दौरा केला होता.
दरम्यान, नागपूर इथं आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारातसोलापूर जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळणार का आणि जिल्ह्याला यंदा तरी भूमिपुत्र पालकमंत्री मिळणार की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.