हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 12:35 IST2025-05-15T12:34:22+5:302025-05-15T12:35:06+5:30
सासरच्या सूनेचा आणि माहेरच्या लेकीचा अचानक झालेल्या मृत्यूमुळे दोन्ही कुटुंबाने टाहो फोडला.

हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
सोलापूर - जीवनातील महत्त्वाचा मानला जाणारा लग्न सोहळा पार पडला आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला देवाज्ञा झाली. या घटनेमुळे लग्नघरात शोककळा पसरली. काही तासांआधी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असलेला आनंद क्षणातच हिरावून गेला. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने जीव सोडावा लागल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना माळशिरस तालुक्यातील बाभूळगाव इथल्या पराडे-गळगुंडे या कुटुंबात घडली.
समीर पराडे या तरुणाचे १३ मे रोजी घोटी येथील जानकी गळगुंडे हिच्याशी मोठ्या दिमाखात विवाह सोहळा पार पडला. नीरा नरसिंहपूर येथील मंगल कार्यालयात हजारो उपस्थितांनी या दोघांवर अक्षता टाकल्या. लग्नानंतर नववधू सासरी आली. दुसऱ्या दिवशी अचानक तिच्या छातीत कळा येऊ लागल्याने तिला तातडीने अकलूज येथील खासगी हॉस्पिटलला नेले. परंतु हॉस्पिटलच्या वाटेतच नववधूवर काळाने झडप घातली. सासरच्या सूनेचा आणि माहेरच्या लेकीचा अचानक झालेल्या मृत्यूमुळे दोन्ही कुटुंबाने टाहो फोडला. मृत जानकीवर बाभूळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
पळून गेलेल्या मुलीला जावयासह स्वीकारले
दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत घरातून पळून जाऊन प्रियकरासोबत लग्न केलेल्या मुलीला जावयासह तिच्या घरच्यांनी स्वीकारल्याचे दिसून आले. प्रियकर आणि प्रेयसी दोघांनी ऑगस्टमध्ये आळंदीत लग्न केले. मात्र ८ महिन्यांनंतर वडिलांनी मुलीला जावयासह स्वीकारले. वैराग पोलिसांच्या समन्वयाने ही घटना घडली. गावातील एका कुटुंबातील सज्ञान मुलगी अचानक घरातून गायब झाली. मुलीच्या घरच्यांनी ती हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. पोलीसही कसून शोध घेत होते. तेव्हा मुलगी शेजारील गावातील एका युवकासोबत पळून गेल्याची माहिती मिळाली.
मुलीने आणि युवकाने ११ ऑगस्ट २०२४ रोजी आळंदीत प्रेमविवाह केला. दोघेही सज्ञान असल्याने पोलिसांचे आणि तिच्या वडिलांचे काहीच चालेना, शेवटी पोलिसांनी मध्यस्थीची भूमिका घेत मुलीचे वडील आणि मुलगी-जावई यांच्यातील दुरावा दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यात पोलिसांना यश आले आणि मुलीच्या वडिलांनीही मनाचा मोठेपणा दाखवून मुलीला जावयासह स्वीकारले.