मोदींचा दौरा ८५ मिनिटांचा; रे नगर आता दिल्ली पोलिसांकडे
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: January 16, 2024 19:10 IST2024-01-16T19:09:29+5:302024-01-16T19:10:16+5:30
मोदींच्या दौऱ्यासाठी रे नगर परिसरात एकूण ६ हेलिपॅड उभारले आहेत. पहिले दोन हेलिपॅड मोदींसाठी राखीव राहणार आहेत.

मोदींचा दौरा ८५ मिनिटांचा; रे नगर आता दिल्ली पोलिसांकडे
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार, १९ जानेवारी सोलापूर दौऱ्यावर असून सकाळी ११ वाजता कुंभारी येथील रे नगर परिसरात उभारलेल्या हेलिपॅडवर त्यांचे आगमन होणार आहे. त्यांचा दौरा एकूण ८५ मिनिटांचा असून यात वृक्षारोपन, मॉडेल हाऊसची पाहणी, विडी कामगारांशी संवाद तसेच रे नगर घरकुलांचे वाटप आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.
मोदींच्या दौऱ्यासाठी रे नगर परिसरात एकूण ६ हेलिपॅड उभारले आहेत. पहिले दोन हेलिपॅड मोदींसाठी राखीव राहणार आहेत. तिसऱ्या हेलिपॅडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चौथ्या हेलिपॅडवर राज्यपाल तसेच पाचव्या आणि सहाव्या हेलिपॅडवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार हे उतरणार आहेत. सभेची तयारी जोरात सुरू आहे. दिल्ली पोलिसांचा ताफा रे नगर परिसरात उतरला असून संपूर्ण रे नगर त्यांनी ताब्यात घेतला आहे. मंगळवार पासून पीएम कार्यालयाचे सचिव सोलापुरात ठाण मांडून आहेत. मंगळवार सकाळी रे नगर परिसरात सचिवांनी दोन तास बैठक घेऊन तयारीची माहिती घेतली, अशी माहिती माजी आमदार तथा रे नगर प्रकल्पाचे प्रवर्तक नरसय्या आडम यांनी दिली.