मुंबई-बंगळुरू औद्योगिक पट्टा निर्माण करणार
By Admin | Updated: August 19, 2014 01:04 IST2014-08-19T01:04:13+5:302014-08-19T01:04:13+5:30
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण : शंकरराव चव्हाण व वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन

मुंबई-बंगळुरू औद्योगिक पट्टा निर्माण करणार
सोलापूर: पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा विकास साधण्यासाठी इंग्लंड सरकारच्या मदतीने मुंबई-बंगळुरू हा औद्योगिक पट्टा निर्माण करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केली. दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामार्ग व पॉवरग्रीड उद्घाटनाच्या कार्यक्रमात केलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री चव्हाण यांनी पुन्हा सत्तेवर आल्यास विविध योजना अमलात आणणार असल्याची ग्वाही देत लोकसभा निवडणुकीत केलेली चूक विधानसभा निवडणुकीत करू नका, असे आवाहन केले.
सोलापूर महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण (डफरीन चौक) व कै. वसंतराव नाईक (नेहरूनगर चौक) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी विकासकामांच्या उद्घाटनासाठी सोलापुरात येत आहेत, म्हणून कोणतेही राजकारण न करता मी या कार्यक्रमास आलो. ही दोन्ही कामे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रयत्नातून झाली आहेत. अर्थव्यवस्थेत गुजरातपेक्षा महाराष्ट्र नंबर वन आहे. महाराष्ट्रातील ५७ टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. त्यामानाने सिंचनाची उपलब्धता नाही. इतर राज्यांशी तुलना केल्यास पंजाब ९८ टक्के, हरियाना ९० टक्के, बिहार ७० टक्के, गुजरात ४० टक्के तर महाराष्ट्रात फक्त १८ टक्के जमीन सिंचनाखाली आहे. असे असताना गेली तीन वर्षे दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी ११ हजार कोटी तर गारपीटग्रस्तांसाठी १० हजार कोटी तातडीने मदत द्यावी लागली. असे असतानाही महाराष्ट्राची आर्थिक सधनता गुजरातपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. लोकसभा निवडणुकीत राजकीय अपघात झाला. धक्कादायक निकाल हाती आले; पण आता लोकांना कळून चुकले आहे. गेल्या पाच वर्षांत दुष्काळ, विकास, शेती, आरोग्य या क्षेत्रांत केलेल्या प्रगतीच्या जोरावर जनता आमच्या बाजूने कौल देईल, असा विश्वास मुख्यमंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापौर अलका राठोड यांनी प्रास्ताविक भाषणात माजी मुख्यमंत्री कै. नाईक व कै. चव्हाण यांचे काँग्रेसच्या उभारणीत मोठे काम आहे. त्यांच्या पुतळ्यामुळे तरुणीस पिढीस हे काम प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला. आ. गणपतराव देशमुख यांनी ७२ च्या दुष्काळात होरपळलेल्या जनतेला रोजगार हमी योजना, पंचायत राज योजना व सोलापूर जिल्ह्याची तहान भागविणारे उजनी धरण कै. नाईक व कै. चव्हाण यांच्यामुळेच मिळाल्याचा उल्लेख केला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आ. हरिभाऊ राठोड यांनी भाषणात बंजारा समाजाच्या मागण्या मांडल्या. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कै. नाईक व कै. चव्हाण यांचे हे पुतळे म्हणजे मराठवाडा व विदर्भातील या नेत्यांचे जिवंत स्मारक म्हणून नावारूपास येतील, असा आशावाद व्यक्त केला.
याप्रसंगी पालकमंत्री दिलीप सोपल, परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री आनंदराव देवकते, सिद्धाराम म्हेत्रे, आ. लक्ष्मण ढोबळे, आ. दिलीप माने, आ. भारत भालके, आ. अमर राजूरकर, आ. प्रणिती शिंदे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, चंद्राम चव्हाण, उपमहापौर हारून सय्यद, स्थायी सभापती बाबा मिस्त्री, परिवहन सभापती आनंद मुस्तारे, दिलीप कोल्हे, सिद्धाराम चाकोते, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश यलगुलवार, जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, महिला अध्यक्ष ज्योती वाघमारे, सुशीला आबुटे, बाळासाहेब शेळके आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी नांदेड येथून नागरिक आले होते. सूत्रसंचालन शोभा बोल्ली यांनी केले.
------------------------------
आंदोलनकर्त्यांना आवाहन
धनगर, कोळी, धोबी, लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळांनी मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्यभरात विविध मागण्यांसाठी आंदोलने सुरू आहेत. आरक्षणाबाबत अडचणी असल्याने दूर करण्यासाठी समित्या नेमल्या आहेत. सर्व निकषांचा विचार करून यातून मार्ग काढून सर्वांना न्याय दिला जाईल. यावर राजकारण न करता विकासाच्या प्रश्नांकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री चव्हाण यांनी केले.
-------------------------------------
मुख्यमंत्र्यांचे निवडणूक पॅकेज
टंचाई गावांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे ६ कोटी
टंचाईग्रस्त तालुक्यांचे पुन्हा सर्वेक्षण
त्या १२३ तालुक्यांना ७ योजना मिळणार
इतर तालुक्यांना ३ योजनांचा लाभ होणारच
प्रत्येक विभागात पर्जन्यमापक बसविणार
प्रत्येक शेतकऱ्यास विम्याचे संरक्षण
प्रकल्पग्रस्तांना रोजगार प्रशिक्षण देणार
वस्त्रोद्योगासाठी नवे धोरण आणणार
प्रत्येक जिल्ह्यात विमानतळ, हेलीपॅड
पाणीपुरवठा योजनांसाठी १४०० कोटी
राजीव गांधी आरोग्य योजना सर्वांना लागू करणार
---------------------------------------------
अन् मंत्री बॅरिकेड्समधून घुसले
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कार्यक्रमस्थळी दोन तास उशिरा आगमन झाले. तोपर्यंत ताटकळलेल्या लोकांना मो. आयाज व भाग्यश्री चव्हाण यांनी गायिलेल्या देशभक्तीपर गीताने संजीवनी दिली. मुख्यमंत्र्यांचे व्यासपीठावर आगमन होताच पालकमंत्री दिलीप सोपल, परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, महापौर अलका राठोड आदी व्यासपीठासमोरून आले. डी झोनमुळे त्यांना व्यासपीठाकडे जाता येईना. शेवटी सोपल बांबूच्या फटीतून वाकून आत घुसले. सोपल तुम्हाला जाता येते, मी तर परिवहन मंत्री असे म्हणत मधुकरराव चव्हाण, चाकोते बांबूखालून घुसले. पण महापौरांना जाता येईना. शेवटी मंडपाच्या बाजूने त्या व्यासपीठावर गेल्या. कै़ शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी पृथ्वीराज व अशोक हे दोन आजी-माजी मुख्यमंत्री चव्हाण एकत्र आले, हा एक चांगला योग आहे, असा सुशीलकुमार शिंदे यांनी उल्लेख केला़