खासदारांच्या वडिलांचा जन्मदाखला तपासणीसाठी पाठवला महाराष्ट्राबाहेर!
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: January 25, 2024 13:04 IST2024-01-25T13:03:36+5:302024-01-25T13:04:23+5:30
तहसीलदारांची माहिती : महिनाभरात अहवाल

खासदारांच्या वडिलांचा जन्मदाखला तपासणीसाठी पाठवला महाराष्ट्राबाहेर!
सोलापूर : खासदार डॉ. जयसिद्धेश्वर यांच्या वडिलांचा जन्मदाखला देशातील कुठल्याही फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी करून घ्या, असे आदेश जातपडताळणी समितीने अक्कलकोटच्या तहसीलदारांना दिला आहे. त्यानुसार महाराष्ट्राबाहेरील फॉरेन्सिक लॅबकडे जन्मदाखला पाठवला असून महिनाभरात लॅबकडून अहवाल येईल, अशी माहिती अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिली आहे.
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर यांच्या वडिलांचा १९१५ सालाचा जन्मदाखला आहे. दाखल्यावर जन्मगाव म्हणून गौडगाव असून तालुका अक्कलकोट असा उल्लेख आहे. बेडा जंगम असा जातीचा उल्लेख आहे. त्यावेळच्या तहसीलदारांनी जन्मदाखला दिला असून सध्याच्या तहसीलदारांनी जन्म दाखल्याची फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी करून घ्यावी. देशातील कोणत्या लॅबकडून तपासणी करून घ्यावी, याचे अधिकार समितीने अक्कलकोटच्या तहसीलदारांना दिले आहेत.
जातपडताळणी समितीकडे दाखल केलेली कागदपत्रे फॉरेन्सिक लॅबकडे पाठवून तपासणी करावी, अशी मागणी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर यांनी जातपडताळणी समितीकडे केली होती. यावर समितीकडे अंतिम सुनावणी होऊन खासदारांची मागणी जातपडताळणी समितीने मान्य केली. त्यानुसार अक्कलकोटच्या तहसीलदारांनी महाराष्ट्राबाहेरील फॉरेन्सिक लॅबकडे पाठवल्याची माहिती सिरसट यांनी दिली.