आइस्क्रीम खाता येईना म्हणून माकडाचा सात जणांना चावा!
By शीतलकुमार कांबळे | Updated: December 21, 2023 15:45 IST2023-12-21T15:44:34+5:302023-12-21T15:45:32+5:30
रक्तही काढले: आयटीआयसमोरील घटना.

आइस्क्रीम खाता येईना म्हणून माकडाचा सात जणांना चावा!
सोलापूर : विजापूर रोड आयटीआयसमोर एका माकडाने गोंधळ घातला. आइस्क्रीमच्या गाडीवर बसून चेरी खाल्ली. पण, आइसक्रीम असलेल्या भांड्याचे झाकण उघडता आले नाही. त्यामुळे चिडलेल्या माकडाने गाडीजवळ आलेल्या माणसांचा चावा घेतला.
आयटीआयसमोर रिक्षा स्टॉप असून त्यापुढे दररोज एक आइस्क्रीमची गाडी थांबते. अचानक कुठूनतरी एक माकड त्या आइस्क्रीमच्या गाडीवर येऊन बसले. गाडीवर असलेले भांडे त्याने फेकून दिले. तिथे असलेली चेरी खाल्ली. मात्र, आइस्क्रीमच्या भांड्याचे झाकण त्याला उघडता येत नव्हते. काही वेळानंतर तिथल्या लोकांनी माकडाला हुसकविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या जवळ आलेल्या सहा ते सात जणांना माकडाने चावा घेतला.
सुमारे तीन ते चार तास ते माकड तिथेच बसून होते. तिथून जाणाऱ्या नागरिकांनी माकडाला केळी, फळे खाण्यास दिले. काहींनी माकडाचे मोबाईलमध्ये शुटींग काढले. काही वेळानंतर तिथे असलेल्या एका रिक्षात माकड बसले. रिक्षा चालक रिक्षा घेऊन तिथून निघून गेला. त्यानंतर तिथल्या नागरिकाचा जीव भांड्यात पडला.