Maharashtra Election 2019; मोदींच्या पुणे दौºयामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांच्या विमानाचे उड्डाण रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 12:29 IST2019-10-18T12:11:21+5:302019-10-18T12:29:09+5:30
तांत्रिक अडचणीचा दावा : घाईघाईत भाषण संपवूनही सोलापुरात करावा लागला मुक्काम

Maharashtra Election 2019; मोदींच्या पुणे दौºयामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांच्या विमानाचे उड्डाण रोखले
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौºयामुळे गुरुवारी सायंकाळी सोलापुरातून पुण्याला होणारी उड्डाणे रोखण्यात आली. त्याचा फटका काँगे्रसचे राष्ट्रीय नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह चार नेत्यांना बसला. शिंदे यांना सोलापुरातच मुक्काम करावा लागला. गुरुवारी रात्री होटगी रोडवरील विमानतळावर शिंदे यांच्या विमानासह इतर चार हेलिकॉप्टर मुक्कामी होते.
ज्योतिरादित्य शिंदे यांची गुरुवारी लातूर, सोलापूर आणि पुण्यात सभा आयोजित करण्यात आली होती. लातूरमध्ये शिंदे यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. लातूरची सभा संपायला उशीर झाला. नियोजित कार्यक्रमानुसार शिंदे यांनी सोलापुरात दुपारी ३.३० पर्यंत येणे अपेक्षित होते. त्यांना पोहोचायला सायंकाळचे साडेपाच वाजले. अंधार होण्यापूर्वीच त्यांनी विमानतळावर परतणे अपेक्षित होते. सायंकाळी साडेपाच पावणेसहाच्या सुमाराला शिंदे आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचा ताफा कर्णिक नगरला पोहोचला. येथे अवघ्या चार मिनिटात शिंदे यांनी भाषण केले. पुन्हा त्यांचा ताफा विमानतळावर वेळेवर पोहोचला.
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होती. पुणे विमानतळावर विशेष सुरक्षा होती. शिंदे यांच्या विमानाला पुण्यात उतरण्यास परवानगी देण्यात आली नाही. विमानतळावर काही वेळ थांबून शिंदे परतले. पुण्यातील त्यांच्या सभा रद्द करण्यात आल्या. एका हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केला.
विमानतळावर विशेष दक्षता
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौºयामुळे पुणे विमानतळावर विशेष दक्षता होती. या कारणास्तव शिंदे यांच्या विमानासह इतर हेलिकॉप्टर्सना उड्डाणाची परवानगी देण्यात आली नव्हती. विमानतळावर गुरुवारी क्लाऊड सिडींगची तीन विमाने, शिंदे यांचे एक विमान आणि चार हेलिकॉप्टर्स थांबून होते, असे एअरपोर्ट अॅथॉरिटीचे व्यवस्थापक संतोष कौलगी यांनी सांगितले.