सोलापुरातून अल्पवयीन मुलास पळवून नेले
By विलास जळकोटकर | Updated: January 31, 2024 18:28 IST2024-01-31T18:28:09+5:302024-01-31T18:28:23+5:30
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.

सोलापुरातून अल्पवयीन मुलास पळवून नेले
विलास जळकोटकर, सोलापूर : शहरातील विडी घरकूल परिसरातून एका १६ वर्षाच्या मुुलाला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी फिर्याद दिल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.
सर्वेश संजय बडवणे (वय- १६, रा. रंगराज नगर, विडी घरकूल, सोलापूर) असे या मुलाचे नाव आहे. फिर्यादीत मुलाचे वडील संजय अंबादास बडवणे यांनी म्हटले आहे की, फिर्यादीचे प्लंबिंग साहित्याचे दुकान आहे. मंगळवारच्या रात्री ८:३० च्या सुमारास त्यांचा मुलगा सर्वेश हा दिसत नसल्याने त्याची शोधाशोध सुरु केली मात्र तो मिळून आला नाही. सारेच या प्रकारामुळे घाबरले. सर्व नातलगांकडेही फोन करुन विचारणा केली.
अखेर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जावून आपल्या मुलाला कोणीतरी अज्ञात कारणावरुन फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणी सपोनि चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, तपास करणारे हवालदार पोळ यांनी बडवणे कुटुंबीयांची भेट घेऊन माहिती घेतली. पुढील तपास सुरु आहे.