पोलिसांच्या ताब्यातील अल्पवयीन मुलगी गेली पळून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 14:48 IST2019-06-20T14:41:30+5:302019-06-20T14:48:29+5:30
सोलापुरातील घटना; पोलीसाच्या मदतीने रेल्वे स्थानक व अन्य ठिकाणी शोध सुरू

पोलिसांच्या ताब्यातील अल्पवयीन मुलगी गेली पळून
मंगळवेढा : फूस लावून पळवून नेल्याप्रकरणातील अल्पवयीन मुलगी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर महिला पोलिसांच्या ताब्यातून पळून गेली आहे. या प्रकरणी महिला पोलिसांनी फिर्याद दाखल केल्याने सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील एका १६ वर्षीय मुलीला पळवून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलीस पथकाने शोध घेऊन १७ जून रोजी पुणे परिसरातून आरोपी व पीडित मुलीला ताब्यात घेऊन मंगळवेढ्यात आणले होते. या पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, मंगळवेढ्यात दाखल केल्यानंतर ती अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे तपासणीत निदर्शनास आले.
पुढील उपचारासाठी त्या मुलीला मंगळवेढा येथे नेमणुकीस असलेल्या महिला कॉन्स्टेबल दीक्षा वाघमारे यांच्या ताब्यात देऊन सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी सकाळी आठ वाजता ती पीडित मुलगी पळून गेली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने रेल्वे स्थानक व अन्य ठिकाणी शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही.