नगर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोलापूर महापालिकेची सभा तहकुब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 14:33 IST2018-09-18T14:27:39+5:302018-09-18T14:33:38+5:30

नगर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोलापूर महापालिकेची सभा तहकुब
सोलापूर : अहमदनगर येथील तोफखाना परिसरात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा सोलापूर महानगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी निषेध केला. या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा मिळावी अशी मागणी करीत ही सभा तहकुब करण्यात आली़ उद्या बुधवारी पद्मशाली समाजाच्यावतीने काढण्यात येणाºया मुकमोर्चात सहभागी होण्याचा निर्धारही सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केला.
सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या सुरूवातीला शहरातील वाढत्या साथीच्या रोगांबाबत लक्षवेधी मांडण्यात आली़ यानंतर महापालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी तातडीचा प्रस्ताव मांडला अहमदनगर येथील प्रकरणामुळे समाजाच्या भावना तीव्र आहेत़ या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी महापालिकेची सभा तहकूब करण्यात यावी अशी मागणी केली.
या मागणीला काँग्रेसचे अॅड़ यु़ एऩ बेरिया, एमआयएमचे तौफिक शेख, राष्ट्रवादीच्या सुनिता रोटे, बसपाचे गणेश पुजारी, भाजपाचे नागेश वल्याळ, माकपच्या कामिनी आडम, सभागृहनेते संजय कोळी यांनी पाठींबा दिला़ आरोग्यांच्या प्रश्नावर उपाययोजना करण्याचा निर्णय झाला आणि ही सभा तहकूब करण्यात येत असल्याचे महापौर शोभा बनशेट्टी यांनी जाहीर केले़