मार्कंडेय महामुनींचा जयजयकार
By Admin | Updated: August 11, 2014 01:12 IST2014-08-11T01:12:24+5:302014-08-11T01:12:24+5:30
रथोत्सवात लोटला भक्तीसागर : दर्शनासाठी मंदिरात सोलापूरकर भाविकांची गर्दी

मार्कंडेय महामुनींचा जयजयकार
सोलापूर : महर्षी मार्कंडेयांचा जयजयकार करीत पद्मशाली समाजातील बालगोपाळांपासून ते आबालवृद्धांनी रविवारी मार्कंडेयांचा रथोत्सव अगदी भक्तिभावाने साजरा केला. लेझीमचा एक ताल-एक सुरात खेळ, हिंदी, मराठी, तेलुगू चित्रपटांमधील गाण्यांच्या तालावर नृत्य अन् शक्तीचे प्रयोग सादर करीत विविध मंडळांनी रथोत्सवाच्या मिरवणुकीत अधिकच रंग भरला. दरम्यान, विजापूर वेस येथील श्री मार्कंडेय मंदिरात पहाटेपासून दर्शनासाठी झालेली गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम होती. रथोत्सवात लोटलेल्या भक्तिसागरात भाविकही तल्लीन होऊन गेले होते.
मार्कंडेय मंदिरात रविवारी पहाटे ५ वाजता गणेशपूजा करण्यात आली. त्यानंतर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते महारुद्राभिषेक करण्यात आला. सकाळी ७ वाजता पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष जनार्दन कारमपुरी यांच्या हस्ते पद्मध्वजारोहण करण्यात आले. सकाळी १०.३० वाजता गुंडला परिवाराने मार्कंडेय रथाची विधिवत पूजा केली. पद्मशाली पुरोहित संघम्चे अध्यक्ष नरेंद्र श्रीमल, नरसिंग कंदीकटला यांनी पौरोहित्य केले. आमदार प्रणिती शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख, नगरसेवक महेश कोठे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश गादेकर, साईनाथ बिर्रु, लक्ष्मीकांत सरगम, माजी नगरसेवक उमेश मामड्याल, ज्ञाती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मार्कंडेय मंदिरापासून रथोत्सवाला प्रारंभ झाला.
मंदिरापासून निघालेल्या रथोत्सवाची मिरवणूक भारतीय चौक, शनिवार पेठ, रत्नमारुती मंदिर, जगदंबा चौक, पद्मशाली चौक, कुचन नगर, आंध्र दत्त चौक, श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालय, भद्रावती पेठ, जोडबसवण्णा चौक, श्री मार्कंडेय चौक, राजेंद्र चौक, भुलाभाई चौक, नेताजी नगर, चाटला कॉर्नर, जोडभावी पेठ, कन्ना चौक, औद्योगिक बँक, साखर पेठ, शंकरलिंग देवस्थान, समाचार चौक, माणिक चौक, विजापूर वेस मार्गे काढण्यात आली. रात्री उशिरा मार्कंडेय मंदिरात रथोत्सवाची सांगता झाली.
मिरवणुकीत खास रंगाच्या पोषाखात कलाकार विविध गाण्यांच्या तालावर नृत्य करताना दिसत होते. भवानी पेठेतील ऋषीकेश डान्स ग्रुप, कुंभारीच्या विडी घरकूलमधील टीआरजी डान्स ग्रुप, यंग चॅलेंज डान्स ग्रुप, बी. आर. डान्स ग्रुप, नीलम नगरातील विघ्नेश्वर डान्स ग्रुप, जय मार्कंडेय जन्मोत्सव मंडळ, मार्कंडेय प्रतिष्ठान, गोवर्धन डान्स ग्रुप, साई समर्थ डान्स ग्रुप, कलावती नगरातील सिद्धी डान्स ग्रुपने एकापेक्षा एक सरस नृत्य सादर करीत उपस्थितांकडून दाद मिळवली. आरकाल मित्र परिवाराचे कार्यकर्ते बेधुंद होत नृत्य करताना वातावरण भारावून गेले होते. महेश कोठे युवा मंचचा लेझीम पथक साऱ्यांच्या नजरेत भरत होता.
एक ताल-एक सुरात चाललेला हा खेळ पाहण्यासाठी चौकाचौकांमध्ये गर्दी होत होती. तेलंग पाच्छा पेठेतील विवेकानंद शक्तीप्रयोग, जयशंकर शक्तीप्रयोग, लक्ष्मी नृसिंह स्वामी झोपडपट्टीतील कर्ण मित्रमंडळाच्या शक्तीप्रयोग मंडळाचे कार्यकर्ते धाडसी प्रयोग सादर करताना पाहणाऱ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहत होते. मुळेगाव रोडवरील विडी घरकूलमधील श्रद्धा गणपती मंडळाने मिरवणुकीत हलता देखावा सादर केला. चांदीचा मुलायम देण्यात आलेल्या रथामध्ये मार्कंडेय मुनींची मूर्ती साऱ्यांच्याच नजरेत भरत होती.