मराठी भाषेला कर्नाटकात कधीच सन्मान मिळणार नाही : माधवी वैद्य
By Admin | Updated: August 13, 2014 23:33 IST2014-08-13T22:42:42+5:302014-08-13T23:33:58+5:30
बेळगावसह कारवार केंद्रशासित करा : साहित्यिक, नाट्य, चित्रपट कलावंतांची मागणी

मराठी भाषेला कर्नाटकात कधीच सन्मान मिळणार नाही : माधवी वैद्य
कोल्हापूर : मराठी भाषेला कर्नाटकात कधीच सन्मान मिळणार नाही. यासाठी बेळगावसह मराठी भाषिक सीमाभाग केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा
डॉ. माधवी वैद्य यांनी आज, बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केले.
यावेळी साहित्यिक, नाट्य-चित्रपट कलावंतांनी येळ्ळूर येथील मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलिसांकडून झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध केला. याबाबतचा ठराव करून तो लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्याचा निर्णय यावेळी झाला.
माधवी वैद्य म्हणाल्या, मराठी भाषेला, मराठी माणसाला आंदोलन करावे लागत आहे, ही खेदाची बाब आहे. सीमाप्रश्नी आंदोलनात मराठी बेळगुंदी येथे तीनजणांना हौतात्म्य पत्करावे लागले. आपल्याच देशातील आपल्याच लोकांकडून भाषेसाठी छातीवर गोळी झेलावी लागते, हे जगातील एकमेव उदाहरण आहे. मराठी भाषिकांना कन्नड कागदपत्रांवर सही करावी लागते. हा मराठी भाषिकांवर महाभयानक अत्याचार आहे. मराठी भाषिकांवर व मराठी भाषेवर अत्याचार सुरू असताना या विरोधात मराठी साहित्यिकांचा आवाज का निघला नाही? आम्ही साहित्यिक पंजाबात मराठी साहित्याचा सेतू बांधत असताना बेळगावात तो बांधू शकत नाही, हे खेदजनक आहे. लवकरच मराठी साहित्य महामंडळाची शाखा बेळगावात सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे (बेळगाव) अशोक याळगी यांनी गेली ६० वर्षे आमचे सीमाप्रश्नी आंदोलन सुरू असल्याचे सांगितले. कन्नड भाषेसाठी तेथील सर्व साहित्यिक एकत्र येतात; परंतु सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्रातील साहित्यिक का एकत्र येत नाहीत, असा सवाल करत आता सर्व साहित्यिक व कलावंत पुढे आले आहेत. ही बाब स्वागतार्ह असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी कर्नाटक शासनातर्फे न परवडणारा जिझिया कर नाट्यसंस्थांच्या गाड्यांना लावला जातो. त्यामुळे बेळगावात महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्यक्रमांची देवाणघेवाण करता येत नाही. यामुळे भविष्यात मराठी भाषिकांवर अन्याय झाल्यास महाराष्ट्रातील सर्व विचारवंत, साहित्यिक, रंगकर्मी, तंत्रज्ञ एकत्र येऊन आंदोलन करतील.
नाट्य परिषद (बेळगाव)च्या वीणा लोकूर म्हणाल्या, बेळगावमध्ये सर्रास कानडीकरण सुरु आहे. त्याला विरोध करण्याचे काम सुरू आहे. भविष्यात या ठिकाणी नाट्यसंमेलन घेण्याचा प्रयत्न आहे.
यावेळी मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष सुनील महाजन, कार्यवाह प्रकाश पायगुडे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सुरेश देशमुख, मराठी नाट्य निर्माता संघाचे अविनाश देशमुख, शिरीष चिटणीस, प्रफुल्ल महाजन, योगेश सोमण, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)