मराठा आंदाेलकाने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सोडले उपोषण; मनाेज जरांगे-पाटलांना पाठिंबा
By राकेश कदम | Updated: February 22, 2024 18:20 IST2024-02-22T18:19:50+5:302024-02-22T18:20:53+5:30
गरज पडल्यास पुन्हा आंदाेलन सुरू करण्याचा इशारा

मराठा आंदाेलकाने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सोडले उपोषण; मनाेज जरांगे-पाटलांना पाठिंबा
साेलापूर : मराठा आरक्षण आंदाेलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेले दीपक पवार यांनी गुरुवारी सायंकाळी सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये उपाेषण साेडले. शासनाने ओबीसी आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास पुन्हा उपाेषणाला बसेन असा इशाराही त्यांनी दिला.
दीपक पवार हे सांगोला तालुक्यातील कडलास गावचे रहिवाशी आहेत. जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमाेर ते सात दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसले होते. उपोषणामुळे प्रकृती ढासळल्याने त्यांना उपचारासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळताच सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार तातडीने सिव्हिल हॉस्पिटल येथे गेले. दीपक पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करून मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार उपोषण मागे घ्यावी अशी विनंती केली. यामुळे दीपक पवार यांनी आमरण उपोषण सोडत असल्याचे सांगितले.
माऊली पवार यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन गरज पडल्यास पुन्हा उपोषण करेल असा इशारा दिला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पवार यांचे बंधू सुनील पवार, शिवाजीराव चापले, हॉस्पिटल येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता गायकवाड आणि इतर उपस्थित होते.