मंगळवेढा सिंचन योजनेस लवकरच मान्यता देणार; उपमुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
By Appasaheb.patil | Updated: August 22, 2022 16:18 IST2022-08-22T16:18:38+5:302022-08-22T16:18:43+5:30
महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

मंगळवेढा सिंचन योजनेस लवकरच मान्यता देणार; उपमुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मंगळवेढा उपसा सिंचन प्रस्ताव योजनेस अधिवेशन संपल्यानंतर सात दिवसांत मुख्यमंत्री यांची मान्यता घेऊन त्यानंतर सात दिवसांत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मंगळवेढा तालुक्यातील ३५ तालुक्यातील ११ गावांचा समावेश म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात झाला आहे उर्वरित २४ गावांसाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजना प्रस्तावित केली आहे. या योजनेस लवकरच मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. आवश्यक असणाऱ्या सर्व मान्यता घेण्यात येतील. याबाबत पावसाळी अधिवेशनात सदस्य समाधान आवताडे याबाबतच्या चर्चेत सहभागी झाले.
मागील अनेक वर्षापासून मंगळवेढा उपसा सिंचन योजना रखडली होती. आतापर्यंत आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींनी याच विषयावर मंगळवेढा तालुक्यात निवडणुका लढल्या. दिवंगत माजी आमदार भारत भालके यांनीही ही योजना पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मात्र विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सर्वांचे लक्ष वेधले.