मंदिरात दर्शन घेऊन दुचाकीवरुन घरी निघालेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
By काशिनाथ वाघमारे | Updated: June 28, 2023 19:09 IST2023-06-28T19:09:02+5:302023-06-28T19:09:05+5:30
बार्शी शहरात मंगळवार पेठेत उत्तरेश्वर मंदिर परिसरात ही घटना घडली.

मंदिरात दर्शन घेऊन दुचाकीवरुन घरी निघालेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
सोलापूर: बार्शी शहरातील उत्तरेश्वर मंदिरात आरती करून देवाचे दर्शन घेऊन घरी निघालेली एक महिला दुचाकीवरुन घराकडे जात असताना पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोन चोरट्यांनी तिच्या गळ्यातील ७५ हजारांचे दीड तोळ्यांचे मंगळसूत्र हिसका मारून पळवल्याची घटना घडली.
मंगळवार, २७ जून २०२३ रोजी रात्री ९ वाजेच्या दरम्यान बार्शी शहरात मंगळवार पेठेत उत्तरेश्वर मंदिर परिसरात ही घटना घडली. याबाबत शैलजा विलास गीते (वय ५४, रा. वायकुळे प्लॉट, उपळाई रोड, बार्शी) या महिलेने बुधवार, २८ जून रोजी शहर पोलिसात धाव घेतली आणि फिर्याद दिली.
चोरट्यांनी १६ सोन्याचे मोठे खरबूजे मनी, २२० सोन्याचे जोंधळे मनी, दोन पानाच्या आकाराचे डोरले असे दीड तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादी महिला शैलजा या दिवसभर घरातील कामे संपवून नेहमीप्रमाणे त्या मंगळवार पेठेतील उत्तरेश्वर मंदिर येथे दुचाकीवरुन आल्या होत्या. आरतीनंतर दर्शन उरकून परतत असताना घराजवळ पाठीमागून एका मोटारसायकलवरुन अनोळखी दोघेजण आले.
त्यांच्यापैकी मागे बसलेल्या तरुणाने शैलजा यांच्या गळ्यातील दीड तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावले. त्यावेळी त्या ओरडून थांब...थांब...म्हणत असताना चोरटे परांडा रोडकडे दुचाकीवर भरधाव निघून गेले. अधिक तपास पोलीस नाईक ठेंगल करत आहेत.