The look of Sambhaji Lake area in Solapur will change | Good News; सोलापुरातील संभाजी तलाव परिसराचा लूक बदलणार
Good News; सोलापुरातील संभाजी तलाव परिसराचा लूक बदलणार

ठळक मुद्देधर्मवीर संभाजी तलावाचे संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी १२ कोटी २१ लाख रुपये मंजूर केलेकेंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने प्रत्यक्षात एक वर्षानंतर साडेतीन कोटी रुपये मिळालेआता एक वर्षानंतर केवळ सुशोभीकरणाच्या ९४ लाख रुपयांचे काम मार्गी लागले

सोलापूर :  धर्मवीर संभाजी तलाव परिसर सुशोभीकरणाच्या वर्कआॅर्डरला मनपा सभेने मंजुरी दिली आहे. या कामाला लवकरच सुरुवात होईल. तलावातील गाळ काढण्याच्या साडेआठ कोटींच्या निविदेवर लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सप्टेंबर २०१८ मध्ये धर्मवीर संभाजी तलावाचे संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी १२ कोटी २१ लाख रुपये मंजूर केले होते. केंद्राकडून प्रत्यक्षात एक वर्षानंतर साडेतीन कोटी रुपये मिळाले. आता एक वर्षानंतर केवळ सुशोभीकरणाच्या ९४ लाख रुपयांचे काम मार्गी लागले आहे.

शहरातील मक्तेदाराला याचे काम मिळाले आहे. मनपा सभेत वर्कआॅर्डर देण्यास मंजुरी मिळाली. मात्र सूचना आणि उपसूचना महापौर कार्यालयात न आल्याने अद्यापही हा विषय प्रशासनाकडे गेलेला नाही. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुुुरुवात होण्याची शक्यता आहे. तलावातील पाण्याची गुणवत्ता आणि गाळ तपासणीबाबत तांत्रिक मक्तेदार निश्चित झाला आहे. त्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आला आहे. मात्र तो अद्यापही अजेंड्यावर आलेला नाही. 

दरम्यान, संजय धनशेट्टी म्हणाले, संभाजी तलाव सुशोभीकरण आणि संवर्धनाची सर्व कामे नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच ‘निरी’च्या सल्ल्यानुसार होत आहेत. तलावाचे सुशोभीकरण करताना त्यातील जलचर सुरक्षित राहावे यासाठी काम होणार आहे. प्रथम सुशोभीकरण, त्यानंतर गाळ काढणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि त्यानंतर तलावात कारंजे उभारण्याचे काम होणार आहे. तलावातील जलपर्णी काढण्यासाठी ३७ लाख ५० हजार रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. या निविदेला प्रथम प्रतिसाद न मिळाल्याने फेरनिविदा काढली. त्यावरही लवकरच निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले. 

हा प्रस्ताव केंद्राकडे लटकला
- संभाजी तलावात होटगी रोड परिसरातून घाणी पाणी येते. धोबी घाटाच्या बाजूला सांडपाणी प्रक्रिया आणि वनभिंत उभारण्यात येणार आहे. या कामाची २ कोटी सहा लाख रुपयांची निविदा काढण्यात आली. परंतु, निरीने या कामासाठी दोन कोटी ५४ लाख रुपये लागतील, असे कळविले आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव पुन्हा केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. मंत्रालयातून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच या कामाबाबत निर्णय होणार आहे. 

पहिल्या टप्प्यात ही होणार कामे 
- जुन्या स्वच्छतागृहांची डागडुजी, संरक्षक भिंतींची दुरुस्ती, पेव्हर ब्लॉक, कट्ट्यावर स्टिल रेलिंग, काँक्रीटचे बेंच, सौर दिवे, गणपती विसर्जन हौदात लोखंडी कायली, १५०० झाडांची लागवड (वनभिंत), धोबी घाटाची डागडुजी, प्रवेशद्वाराजवळ दुरुस्तीची कामे. मक्तेदाराने ही सर्व कामे सहा महिन्यांत पूर्ण करायची आहेत. 

Web Title: The look of Sambhaji Lake area in Solapur will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.