लोकसभेची २०२४ ची निवडणूक ही शेवटची निवडणूक असेल: आमदार प्रणिती शिंदे
By राकेश कदम | Updated: December 22, 2023 13:25 IST2023-12-22T13:24:53+5:302023-12-22T13:25:31+5:30
खासदार निलंबनाविरोधात सोलापुरात इंडिया आघाडीचे निदर्शने

लोकसभेची २०२४ ची निवडणूक ही शेवटची निवडणूक असेल: आमदार प्रणिती शिंदे
राकेश कदम
सोलापूर : लोकसभेची 2024 ची निवडणूक ही देशातील शेवटची निवडणूक असेल. मतदानाचा अधिकार काढून घेतला जाईल, असा इशारा काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी सोलापुरात दिला.
लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांच्या निलंबनाविरोधात इंडिया आघाडीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या पुनम गेट समोर जाहीर निदर्शने करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. या आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम, शिवसेनेचे माजी आमदार उत्तमप्रकाश खंदारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, देशातील इंडिया आघाडीचा आता एकच शत्रू आहे तो म्हणजे भाजप. कोणतेही आवाहन येऊ देत एकत्र येऊन लढुया. एकत्र लढलो तरच देशातील लोकशाही जिवंत राहील. देशातील लोकांना आता पर्याय हवा आहे. सर्व समाज घटक त्रस्त आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सर्वाधिक मोर्चे आले. सामान्य माणसाला पर्याय देण्यासाठी एकत्र राहू. इंडिया आघाडीच्या माध्यमातून वाड्यावर तांड्यावर जाऊ, असेही आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.