Lok Sabha Election 2019; माढ्यामध्ये देशमुख विरुद्ध मोहिते-पाटील लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 12:58 IST2019-03-13T12:54:04+5:302019-03-13T12:58:49+5:30
नावे निश्चित, पण पक्षांनी ठेवला निर्णय राखून; विजयदादा की रणजितसिंह, हीच उत्सुकता

Lok Sabha Election 2019; माढ्यामध्ये देशमुख विरुद्ध मोहिते-पाटील लढत
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले असले तरी शरद पवार यांच्या भूमिकेवर पुढील निर्णय राखून ठेवला आहे. पवारांच्या माघारीनंतर खासदार विजयसिंह मोहिते-पाटील किंवा त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता होती; मात्र मंगळवारी अकस्मातपणे पुन्हा एकदा माणदेशातील प्रभाकर देशमुख यांच्या नावाची राष्ट्रवादी पक्षात चर्चा सुरू झाल्याने मोहिते-पाटील घराण्याच्या भूमिकेकडे साºयांचे लक्ष लागून राहिले आहे.
माढ्यात पवारांच्या विरोधात भाजपाकडे स्थानिक तगडा उमेदवार नसल्यामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनाच उमेदवारी देण्याचा घाट घातला गेला होता; मात्र पवारांच्या माघारीनंतर भाजपाचाही उमेदवार बदलला जाणार का? याची चर्चा सुरू झाली होती. माढ्यात राष्टÑवादीचा उमेदवार कुणीही असो, भाजपाकडून सुभाष देशमुखच उभारणार अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे, देशमुखांची कार्यकर्ते मंडळीही सोलापुरातून माढा लोकसभा मतदारसंघात प्रचाराला लागली आहेत.
मंगळवारी अचानक प्रभाकर देशमुखांचे नाव चर्चेत आले. रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपाचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेल्यामुळे नव्या चर्चेला ऊत आला. प्रभाकर देशमुखांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली गेली तर मोहिते-पाटील भाजपामध्ये जाणार, अशाही बातम्या सोशल मीडियावर झळकल्या. राष्ट्रवादीकडून मोहिते-पाटील उभारले तर भाजपाकडून सुभाष देशमुख निवडणूक लढवतील. राष्ट्रवादीकडून प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी मिळाली तर कदाचित भाजपाकडून मोहिते-पाटील यांना उभे केले जाईल, अशीही शक्यता रणजितसिंहांच्या महाजन भेटीमुळे व्यक्त केली जात आहे. याचा अर्थ माढ्यात देशमुख विरुद्ध मोहिते-पाटील अशीच लढत होईल.
पवारांनी पुनर्विचार करावा
माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी शरद पवार यांनी पुनर्विचार करावा, अशी मागणी माढा येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. मंगळवारी राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत निवडणूक लढविण्याबाबत पवारांना विनंती करण्यात आली.