रंगपंचमी लाईव्ह...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 08:23 PM2019-03-25T20:23:43+5:302019-03-25T20:24:59+5:30

रंगपंचमी असल्यानं आज साराच दिवस कसा ठप्प. बाजारपेठेत तुरळक गर्दी, रस्त्यावर वाहनं आहेत, तीही रंगात न्हालेल्या तरुणाईची.

Live with colorful! | रंगपंचमी लाईव्ह...!

रंगपंचमी लाईव्ह...!

googlenewsNext

- रवींद्र देशमुख

रंगपंचमी असल्यानं आज साराच दिवस कसा ठप्प. बाजारपेठेत तुरळक गर्दी, रस्त्यावर वाहनं आहेत, तीही रंगात न्हालेल्या तरुणाईची. पार्क चौकातील पत्रकारांच्या हॉलमध्ये परिषदा नसल्याने कोणती चहल-पहल नाही...अध्यक्ष विक्रमबापूंशी गप्पा मारत नव्या युगातील सर्वच नारद निवांत होते... इतक्यात आमच्या मिलिंदच्या डोक्यात आयडिया आली...चला बेऽऽ उमेदवारांकडे जाऊ, रंग बी लावणं होतंय अन् बातमी बी घावंल..ही आयडिया सर्वांनी उचलून धरली अन् सोलापुरी नारदांनी थेट ‘जनवात्सल्य’ गाठलं...

गवतातला साप शोधा!
सातरस्त्यावरील वळसंगकर वकिलांच्या बंगल्याला वळसा घालून ‘जनवात्सल्य’च्या बोळात वळताच लोकांची गर्दी दिसून आली...कुणाच्या हातात रंगाच्या बादल्या, कुणाकडे विविध रंगांचे पत्र्याचे डबे..साहेबांना रंग लावण्यासाठी ते आले होते; पण गेटमध्येच त्यांनी यलगुलवार सरांना गाठलं. सरांनी घाईगडबडीतच रंग लावून घेतला अन् ते बंगल्यात निघून गेले...प्रकाश मालकांच्या बुलेटचा आवाज ऐकू आल्यावर मात्र त्यांचा चेहरा खुलला. मालकांना रंग लावल्यावर बक्कळ खुशी मिळणार हे त्यांना ठाऊक होतं. झालंही तसंच! आता टार्गेट साहेब होते; पण वाले मालकांनी त्यांना गोड बोलून पाठवून दिलं. इकडे बंगल्यात हिशोब घातला जात होता. साहेबांचे शुभचिंतक कासार, चिनीवार अन् कामतांचे राजन बाळासाहेब किती मतं खातील? ..चिंतामग्न होऊन ही गणितं मांडताना आज रंगपंचमी असल्याचंही ते विसरून गेले होते..साहेब जिना उतरून खाली येताना हे सारं पाहत होते. ते म्हणाले, सोलापूरकरांनी आजवर मला जे दिलंय, त्याचा हिशोब मोठ्ठाय. आताही ते स्वत:ला करेक्ट करून मला भरभरून देतील. चला, काळजी सोडा, हा रंग एकमेकांना लावा अन् कामाला लागा!..पण गवतात लपलेले साप मात्र शोधा, आपल्याला त्यांच्यापासूनच धोका आहे!...सर्व जण रिलॅक्स झाले...‘जनवात्सल्य’ हास्याच्या रंगात न्हाऊन निघाले.

आता महास्वामींना चिंता कसली?
शेळगी मठात येणाºया भाविकांची संख्या दोन दिवसात कमालीची वाढली. कसब्यातले बहुसंख्य देवदर्शनाला येऊ लागले... सर्व अण्णा, अप्पा अन् मालक लोक नतमस्तक होऊ लागले. आज रंगपंचमी महाराजांना कसा रंग लावायचा?  तरुण कार्यकर्त्यांना प्रश्न होताच; पण आपल्या आपणच मठाबाहेर रंग खेळावा म्हणून एका बादलीत रंग कालवला...इतक्यात हसत हसत मठाबाहेर येणाºया महास्वामींना बाहेरील गर्दी दिसली अन् हसरा चेहरा एकदम आकसून गेला...ही गर्दी कसली? जमावाने एकत्र येऊ नका, नाही तर दुसरी नोटीस यायची!.. स्वामीजी कृष्णा मास्तर अन् बुळ्ळा यांच्यासमोर पुटूपुटू लागले..विजय मालकांना यायला वेळ लागत असल्यामुळे आधीच चिंता अन् आता नोटिसीची नवीन काळजी...त्यातच डिपॉझिटचे काय करायचे? हा प्रश्न...महास्वामीजींची चिंता काही मिटत नव्हती आणि स्वामीजींना समजावून सांगता सांगता मात्र मास्तर अन् बुळ्ळांच्या चेहºयावरील रंग मात्र पुरता उडून गेला होता.

मामा का झटका जोर से !
मालक राजवाडे चौकातल्या आॅफिसात बसले होते. आम्ही आलोय म्हटल्यावर सिद्धूनं निरोप दिला अन् मालकांनी लगेच बोलावून घेतलं; आम्ही मामांच्या विषयावर बोलू लागलो...मालक वैतागून गेले...जाऊ द्या वोऽऽ तो विषय सोडून द्या. विश्वासानं ताकद दिली होती; पण काय करायचं.? वळणाचं पाणी वळणावरच गेलं...सिद्धूनं पुन्हा निरोप आणला, मालक पाणीवेसेतील गँग रंग लावायला आलीय. त्यांना थांबायला सांगितलं. मग आम्ही महास्वामीजींचा विषय काढला, मालक खूष!..पण त्यांना एकदम आठवलं, शेळगी मठात जायचंय... महास्वामीजी वाट पाहतायेत...पाणीवेसच्या रंगात माखून मालकांनी शेळगीकडे प्रयाण केलं.

व्याह्याबद्दल बोलू काही !
होटगी रोडवरील अलिशान बंगल्यात नेहमीसारखी वर्दळ होती. ‘दक्षिण’मधले कार्यकर्ते, गटातील नगरसेवक, सर वगैरे अन् आम्ही गप्पा मारत समोर थांबलो होतो. बापूंनी आम्हाला बोलावून घेतलं..मोठ्या आनंदी मूडमध्ये बापू बसले होते. आम्हाला पाहताच, काय रंग लावायला आलात का?...बापू म्हणाले. आम्हीही होकार दिला. कपाळाला चुटकीभर रंग लावून समोर कोचवर बसलो...माढ्याचा विषय काढला, ‘दक्षिण’वर बोलू लागलो; पण बापू शांत...मला कुठलं राजकारणातलं कळतंय? मी आपला साधा, पक्ष सांगेल तिथे लढणारा. उगीच कशाला बोलायचं?..बापूंचा अचानक बदललेला मूड ओळखून आम्ही पुण्यातील व्याह्यांचा विषय काढला अन् काकडेंच्या यू टर्नवर बापू भरभरून बोलू लागले!...बापूंच्या रंगात त्यांचे कार्यकर्ते अन् नेते पुरते रंगून गेले.
 

Web Title: Live with colorful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.