लर्निंग लायसन्सचा उडाला बोजवारा
By Admin | Updated: August 6, 2014 01:17 IST2014-08-06T01:17:42+5:302014-08-06T01:17:42+5:30
सर्व्हर ठप्प : दहा मिनिटांच्या परीक्षेसाठी खर्च करावा लागतो दिवस

लर्निंग लायसन्सचा उडाला बोजवारा
सोलापूर: उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लर्निंग लायसन्स विभागातील सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने सर्व संगणक ठप्प झाले. त्यामुळे दहा मिनिटांच्या परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना अख्खा दिवस खर्च करावा लागला. संगणकात होणाऱ्या बिघाडामुळे अनेक उमेदवारांना नापासाचा शेरा मारून त्यांना पुन्हा आठ दिवसांनी येण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे अनेक उमेदवार हताश होऊन अखेर एजंटांकडे जात आहेत. ही संगणकीय यंत्रणा एजंटांना चालना देण्यासाठीच तयार केली असल्याची शंका उमेदवारांनी व्यक्त केली.
सोलापुरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (डेप्युटी आरटीओ) शहरापासून (एसटी स्टँड) तब्बल साडेसहा किमी लांब असलेल्या सुंंदरम नगर येथे स्थलांतरित होऊन सुमारे दहा वर्षे उलटली. नवीन इमारत, चाचणी धावपट्टीचे थाटात उद्घाटन होऊनही पाच वर्षे उलटून गेली मात्र अद्याप लर्निंग लायसन्स देणाऱ्या व्यवस्थेची यंत्रणा परिपूर्ण झाली नाही. लर्निंग लायसन्स काढायला येणाऱ्यांची भली मोठी संख्या त्या तुलनेने परीक्षेसाठी उपलब्ध असणारे तुटपुंजे संगणक, त्यातही ऐन परीक्षेत ठप्प होणारा सर्व्हर आणि दुपारच्या वेळी एजंटांची थेट परीक्षागृहात होणारी घुसखोरी यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालातील लर्निंग लायसन्स विभागाचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे.
आरटीओ कार्यालयाची नवीन इमारत उभी राहिली तेव्हा त्याच्या दुसऱ्या मजल्यावर लर्निंग लायसन्ससाठी पहिल्यांदा संगणकीकृत परीक्षा सुरु झाली. एकाचवेळी ३० उमेदवार परीक्षा देऊ शकतील अशी व्यवस्था येथे निर्माण केली होती. मात्र सर्व उमेदवारांसाठी एकाच मोठ्या स्क्रीनवर प्रश्न विचारले जात असल्याने या चाचणीवेळी एकमेकांशी चर्चा करुन वा कॉपी करुन उत्तर देण्यावर नियंत्रण मिळत नव्हते. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून येथील संपूर्ण यंत्रणा उलचून मुख्य इमारतीच्या मागील भागात हलविण्यात आली. तीन खोल्या आणि पत्राशेडमध्ये असलेल्या ठिकाणी जागा मोठी असली तरी केवळ १८ संगणक असल्यामुळे एकाच वेळी १८ उमेदवार या ठिकाणी परीक्षा देऊ शकतात. शिवाय त्यातील काही संगणक नेहमीच नादुरुस्त असल्याने त्यामध्ये आणखी घट होते. अनेक वेळा सर्व्हरमध्ये बिघाड झाला की सर्व संगणक ठप्प होतात. ते दुरुस्तीसाठी अभियंत्याला बोलावण्यापासून ते दुरुस्तीपर्यंत सुमारे दोन तास लागतात़ त्यामुळे दहा मिनिटांच्या परीक्षेसाठी उमेदवारांना अख्खा दिवस वाया घालवावा लागतो. शिवाय लायसन्स काढण्यासाठीचे टप्पे कसे आहेत हे दर्शवणारा फलकही दर्शनीय ठिकाणी लावला नाही, त्यामुळे उमेदवारांचा गोंधळ आणि कर्मचाऱ्यांना सूचनांसाठी कायम तोंडाचा पट्टा सुरु ठेवावा लागतो. एखादाही कागद अपुरा ठरणार असेल तर त्याला समजावून सांगण्याऐवजी बाहेरचा रस्ता दाखवला जातो. जणू उमेदवार हाताश होऊन एजंटाकडेच जावा हाच उद्देश असतो.
---------------------------------------
चाचणी धावपट्टीपेक्षाही कठीण...
पक्के लायसन्स मिळविताना गाडी चालविण्याच्या चाचणी परीक्षेसाठी हजारो रुपये खर्च करुन धावपट्टी तयार करण्यात आली आहे.
चालक वाहन चालविण्यात तरबेज आहे की नाही हे तपासण्यासाठी या चाचणी धावपट्टीवर उतार-चढ, गोलाकार वळण, बोगदा असे अनेक अडथळे निर्माण करण्यात आले आहेत.
मात्र त्यापेक्षा कठीण मार्ग लर्निंग लायसन्स विभागाकडे जाणारा आहे. पावसामुळे प्रचंड चिखलमय झालेल्या या कच्च्या रस्त्यावर वाहनावरून जाणे लांबच मात्र पायी जातानाही कसरत करावी लागते.
नवीन रिक्षाधारकांना पासिंगसाठी अशा चिखलातूनच नव्या रिक्षा घेऊन जावे लागते़ त्यामुळे गाडीला नंबर आणि चिखल आधी लागतो. किमान हा रस्ता तरी व्यवस्थित करावा, अशी मागणी होत आहे.