विलास जळकोटकर
सोलापूर : घरगुती वादातून पत्नीचा खून करण्याची धक्कादायक घटना स्वराज्य विहारमध्ये शुक्रवारी (१८ जुलै) सकाळी उघडकीस आली. खून केलेला पती पेशाने वकील असून, त्याने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हजर राहून कबुली दिली. भाग्यश्री प्रशांत राजहंस (वय ३४, रा. स्वराज विहार, ब्रीजजवळ, सोलापूर) असे मयतेचे नाव आहे. प्रशांत रवींद्र राजहंस (वय ४४,रा. स्वराज्य विहार, सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनुसार शहरातील वसंत विहार परिसरातील स्वराज्य विहार मध्ये यातील मयत विवाहिता भाग्यश्री प्रशांत राजहंस ही तिच्या वकील पती प्रशांत यांच्यासमवेत वास्तव्यास होती. पती-पत्नीच्या घरगुती वादातून पती प्रशांत याने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करुन खून केला. त्यानंतर तो स्वत: फौजदार चावडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या दालनात हजर झाला. खुनाची कबुली दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पोलिसांचा ताफा स्वराजविहारकडे रवाना झाला. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. तेथून रुग्णवाहिकेद्वारे बेशुद्धावस्थेतील भाग्यश्रीचा सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित पाटील यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे डाॅक्टरांनी तपासणी केली असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे.
टोकाचे पाऊल का? शोध सुरु
पतीने स्वत: पोलीस ठाण्यात हजर राहून पतीने आपल्या कृत्याची कबुली दिल्याने उच्चशिक्षित असलेल्या वकील पतीकडून एवढे टोकाचे पाऊल का उचलले गेले याचा पोलीस शोध घेत आहेत.