सलग तिसऱ्या दिवशी पंढरपूर तालुक्यात कोसळधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:15 IST2021-07-12T04:15:21+5:302021-07-12T04:15:21+5:30
जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस झाल्यानंतर तब्बल एक महिनाभर तालुक्यातून पाऊस गायब झाला होता. त्यामुळे शेतकरी, नागरिकांमधून चिंता व्यक्त ...

सलग तिसऱ्या दिवशी पंढरपूर तालुक्यात कोसळधारा
जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस झाल्यानंतर तब्बल एक महिनाभर तालुक्यातून पाऊस गायब झाला होता. त्यामुळे शेतकरी, नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जोरदार पुनरागमन केल्याचे दिसत आहे. पंढरपूर शहर, वाखरी, पटवर्धन कुरोली, गादेगाव, कोर्टी, कासेगाव आदी भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साठले होते. अनेक शेतातही पाणी साठल्याने ऊस, केळी, मका, डाळिंब पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
ऊस लागवड सुरू होणार
पंढरपूर तालुका हा ऊसपट्टा म्हणून जिल्ह्यात परिचित आहे. प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू झाला की जून महिन्यात ऊस लागवडीला सुरुवात होते. मात्र यावर्षी पावसाने ओढ दिल्याने अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवडी थांबवल्या होत्या. मात्र आता गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे खोळंबलेल्या ऊस लागवडी पुन्हा सुरू होतील. मजुरांना रोजगार मिळणार असल्याने शेतीच्या कामांना पुन्हा गती प्राप्त होणार आहे.
फोटो :::::::::::::::::::
पंढरपूर तालुक्यात झालेल्या दमदार पावसाने सखल भागात असे पाणी साठले होते.