खड्डेच खड्डे चोहीकडे... नवीपेठेतला डांबरी रस्ता मात्र गेला कुणीकडे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 02:19 PM2019-11-20T14:19:05+5:302019-11-20T14:21:58+5:30

सोलापूर शहरातील प्रमुख बाजारपेठेतील रस्त्यांची दयनीय अवस्था : तातडीने लक्ष देण्याची व्यापाºयांची मागणी

Khadde khadde Chohi ... Navpethe paved road went to somebody ... | खड्डेच खड्डे चोहीकडे... नवीपेठेतला डांबरी रस्ता मात्र गेला कुणीकडे...

खड्डेच खड्डे चोहीकडे... नवीपेठेतला डांबरी रस्ता मात्र गेला कुणीकडे...

Next
ठळक मुद्देवास्तविक पाहता व्यापारीपेठ असलेल्या नवीपेठेमधील रस्ता सिमेंटचा होणे अपेक्षित नवीपेठेमधील रस्ता हा अरूंद, बहुतांश रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले मागील कित्येक वर्षांपासून नवीपेठेमधील रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेतले नाही

सोलापूर : सोलापूरचे नाक म्हणून समजली जाणारी व सोलापुरातील प्रमुख बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेली नवीपेठ बाजारपेठ़़ या बाजारातील रस्ते अत्यंत निकृष्ट झाले आहेत़ सर्वत्र खड्डेच खड्डे दिसून येत आहेत़ एवढेच नव्हे तर वाढत्या वाहनांची गर्दी व पडलेल्या खड्ड्यांमुळे बाजारपेठेत धुळीचे प्रमाण वाढलेले आहे़ निकृष्ट रस्ते, धूळ, ड्रेनेजच्या पाण्यामुळे सुटणारी दुर्गंधी आदी समस्यांनी नवीपेठेतील व्यापारीवर्ग संतापलेला आहे.

महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाºयांसह लोकप्रतिनिधींनी याकडे वेळीच लक्ष घालून नवीपेठेच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.

कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात यांसह सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील सर्वसामान्यांसह उच्चभ्रू लोक खरेदी करण्यासाठी नवीपेठेला पसंती देतात. ज्वेलरी, सोने-चांदी, कपडे, साड्या, शालेय साहित्य, खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आदींच्या खरेदीसाठी दररोज हजारो लोक नवीपेठेला भेटी देतात़ कमी किंमत, अधिक गुणवत्ता, उत्तम सेवा, दर्जेदार वस्तू या ना अनेक वैशिष्ट्यांमुळे नवीपेठेमधील खरेदी मोठ्या प्रमाणात होते. मात्र मागील वर्षापासून नवीपेठेच्या विकासकामांकडे सोलापूर महापालिकेच्या अधिकाºयांनी दुर्लक्ष केले आहे.

दरम्यान, मेकॅनिक चौक ते दत्त चौक, शिंदे चौक ते भागवत टॉकीज, लकी चौक ते शिवस्मारक सभागृह, मोबाईल गल्ली, चौपाड आदी परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत़ एवढेच नव्हे तर ड्रेनेजच्या पाण्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे़ परगावाहून आलेल्या ग्राहकांना या दुर्गंधीचा सामना करीत खरेदी करावी लागत आहे़ मोबाईल गल्लीत तर पाणीच पाणी झाले आहे़ शिंदे चौकात मोठा खड्डा पडला आहे़ याकडेही महापालिकेच्या प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे़ 

सात वर्षांपूर्वी केला होता रस्ता
-  महापालिकेकडून गणेशोत्सव, नवरात्र काळातच खड्डे बुजविले जातात. पावसाळ्यात तर या रस्त्यांची अवस्था भयानकच असते़ खड्ड्यात गाडी आदळली की खड्ड्यातील पाणी थेट दुकानात येते़ त्यामुळे व्यापारी वर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ एवढेच नव्हे तर दुचाकी व चारचाकी जाताना त्या गाड्यांच्या चाकामुळे उडणारे बारीक खडेही थेट दुकानात येतात़ काही वेळा तर दुकानात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकासही ते दगड लागल्याच्या घटना घडल्या असल्याचे व्यापाºयांनी सांगितले़ 

छोटे-मोठे अपघात नित्याचेच...
- नवीपेठ परिसरातील रस्ते हे अरूंद झाले आहेत़ त्यातच फेरीवाल्यांमुळे नवीपेठेचा बहुतांश रस्ता हा नाहीसा झाला आहे. अशातच दुचाकी व चारचाकी गाडी गर्दीत घुसल्यास वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो़ दरम्यान, खड्ड्यात गाडी आदळल्यास चालकाचा गाडीवरचा ताबा सुटून छोटे-मोठे अपघात नेहमीच घडतात़ या अपघाताचे रूपांतर भांडणात होते अन् कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो हेही तितकेच खरे, असेही व्यापारी वर्गाने सांगितले़

वास्तविक पाहता व्यापारीपेठ असलेल्या नवीपेठेमधील रस्ता सिमेंटचा होणे अपेक्षित आहे़ मात्र मागील पाच ते सात वर्षांपासून हा रस्ता दुरूस्त झाला नाही. चेंबर, ड्रेनेजमधून दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्यामुळे ग्राहक दररोजच नाराजी व्यक्त करीत आहेत़ आम्ही ३५ वर्षांपासून व्यापार करतो़ पूर्वी दोन वेळा नवीपेठेची साफसफाई केली जात होती, आता एक वेळेस होत आहे़ याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़ 
- विजय पुकाळे, सेक्रेटरी, नवीपेठ व्यापारी असोसिएशन, सोलापूर

नवीपेठेमधील रस्ता हा अरूंद होत जात आहे़ नवीपेठेमधील बहुतांश रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले असताना महापालिकेच्या वतीने कोणत्याच सेवासुविधा पुरविल्या जात नाहीत़ रस्ते दुरूस्तीचे काम हाती घ्यावे, व्यापाºयांना हव्या त्या सेवासुविधा निर्माण कराव्यात, वन वे ची अंमलबजावणी करावी़ 
- रवी गोयल, व्यापारी, नवीपेठ, सोलापूर

नवीपेठेकडे सातत्याने महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. स्मार्ट सिटीच्या योजनेत नवीपेठेचा समावेश करायला हवा होता़ म्हणजे स्मार्ट सिटीत नवीपेठही स्मार्ट झाले असते़ रस्ता अरूंद आहे, त्यामुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतो़ शहरातील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत अधिकाºयांच्या मदतीने नवीपेठेचा सर्वांगीण विकास करावा़ व्यापार, ग्राहक, उलाढाल वाढण्यास मदत होईल़
- अभय जोशी, व्यापारी, नवीपेठ, सोलापूर

मागील कित्येक वर्षांपासून नवीपेठेमधील रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेतले नाही़ चौपाड, शिंदे चौक, मेकॅनिक चौक, लकी चौकातील रस्ते सररास खड्ड्यातच गेले आहेत़ खड्ड्यांमुळे व्यापाºयांसह ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे़ ग्रामीण भागातील ग्राहक खरेदीसाठी नवीपेठेत मोठ्या प्रमाणात येतात़ या खड्डेमय रस्त्यांमुळे त्यांना चालताही येत नाही. 
- मिलिंद वेणेगुरकर, सराफ व्यावसायिक, नवीपेठ, सोलापूर

Web Title: Khadde khadde Chohi ... Navpethe paved road went to somebody ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.