कार्तिकी यात्रा सोहळा; राज्यभरातून लाखांवर भाविक दाखल
By Appasaheb.patil | Updated: November 21, 2023 18:04 IST2023-11-21T18:02:59+5:302023-11-21T18:04:19+5:30
संताच्या पालख्या आल्या पंढरपूरजवळ दाखल.

कार्तिकी यात्रा सोहळा; राज्यभरातून लाखांवर भाविक दाखल
पंढरपूर : कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा गुरुवार २३ नोव्हेंबर २०२३ रोजी साजरा होत आहे. एक दिवसावर सोहळा येवून ठेपला आहे. त्यामुळे संताचे लहान मोठे पालखी सोहळे पंढरपूरनजीक दाखल झाले आहेत. तर येथील ६५ एकर येथे देखील लाखांवर भाविक दाखल झाले आहेत. भाविक राहुट्या, तंबू, मंडप उभारुन वास्तव्य करु लाागले आहेत. ६५ एकरात भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
कार्तिकी यात्रेसाठी चंद्रभागात नदीवाळवंटात उभारण्यात येत असलेल्या राहुटयांना चंद्रभागा नदीपलीकडील ६५ एकरात दिंड्यांना राहण्यासाठी प्रशासनाकडून जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. पंढरपुरातील दाखल झालेल्या दिंड्यांमधील वारकरी भजन, कीर्तन व प्रवचनात दंग झाले असल्याने भक्ती सागर विठ्ठल भक्तीत दंग झाल्याचे चित्र दिसून येते.
पंढरपूर नगरपालिकेच्यावतीने या परिसरात कायम स्वरुपाची ८०० शौचालये तर तात्पुरती ४०० शौचालये उभारण्यात आली आहेत. पिण्यासाठी नळाव्दारे पाणी, पाण्याचे टँकर उभारण्यात आले आहेत. तर लाईटची सुविधा मोफत दिली आहे. वीजवितरणकडून विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. तर गॅस जोडणी देखील देण्यात येत आहे. ६५ एकर येथे सुरक्षा, वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आल्याने भाविकांची गैरसोय थांबली आहे. भजन, किर्तनाची सेवा येथेच पार पाडली जात असल्याने भक्तीसागरात भक्तीमय वातावरण तयार झाले आहे. येथे अत्यावश्यक सेवासुविधा पुरवण्याबरोबर खासगी दुकानदारांनी प्रासादिक साहित्याची दुकाने, हॉटेल, खेळणी आदींची दुकाने उभारण्यात आली आहेत.