जॉब मेळावा अन् कौशल्य प्रशिक्षणातून तांड्यातील लोकांना मिळणार रोजगार

By appasaheb.patil | Published: September 21, 2021 12:39 PM2021-09-21T12:39:07+5:302021-09-21T12:39:13+5:30

सोलापूर ग्रामीण पोलिसांचे ऑपरेशन परिवर्तन: हातभट्टी कुटुंबीयांकडून माहिती गोळा करण्यास सुरुवात

Job fair and skills training will provide employment to the people of Tanda | जॉब मेळावा अन् कौशल्य प्रशिक्षणातून तांड्यातील लोकांना मिळणार रोजगार

जॉब मेळावा अन् कौशल्य प्रशिक्षणातून तांड्यातील लोकांना मिळणार रोजगार

Next

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : अवैध हातभट्टी चालकांचे पिढ्यानपिढ्यांपासून सुरू असलेले अड्डे उद्ध्वस्त करण्यात येत आहेत. या हातभट्टी चालकांना अवैध व्यवसायापासून दूर करून चांगल्या व्यवसायाकडे वळवण्याचे काम ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून सुरू आहे. लवकरच तरुणांसाठी जॉब मेळावा अन् कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमातून हजारो हातभट्टी व्यावसायिकांना नवा व्यवसाय, रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून ७१ गावांमध्ये ऑपरेशन परिवर्तन हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. अवैधरित्या हातभट्टी चालवणाऱ्यांवर कारवाई करुन तो पूर्णपणे बंद करून हातभट्टी चालवणाऱ्या व्यावसायिकांचं आणि तरुणांचं समुपदेशन करुन त्यांना व्यवसाय, उद्योग व नोकरीसाठी समुपदेशन, मदत करण्याचा प्रयत्न ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ८५ टक्के हातभट्ट्या नष्ट करण्यात आल्या आहेत. अनेक हातभट्टी चालकांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला अनेकांनी शेती व्यवसायात लक्ष घातले आहे.

महिलांना शासकीय याेजनांचा लाभ मिळणार

सोलापूर जिल्ह्यातील हातभट्टीवर काम करणाऱ्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून त्यांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न असणार आहे. संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना आदी विविध योजनांचा महिलांना लाभ मिळवून देण्यात येणार आहे. शिवाय बचत गटांची निर्मिती करून बचत गटांच्या माध्यमातून बँकेच्या अर्थसहाय्यातून विविध उद्योग, व्यवसायाची निर्मिती महिलांसाठी करण्यात येणार आहे.----------

माहिती संकलित करण्याचे काम वेगात...

तरुणांना जॉब, जॉब न करणाऱ्यांना उद्योग, व्यवसाय निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक हातभट्टी व्यावसायिकांच्या कुटुंबीयांकडून १० ते १५ प्रश्न असलेला फाॅर्म भरून घेण्यात येत आहे. आतापर्यंत ५०० ते ७०० फॉर्म भरले आहेत. त्याची पडताळणी करण्यात येत असून लवकरच सविस्तर माहिती एकत्रित करून जॉब मेळावा, कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

-----------

मुलांच्या शिक्षणासाठी मदत...

मुलांच्या शिक्षणासाठीही सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून विशेष मदत करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारे साहित्य, शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, विविध शासकीय नोकरीसाठीचे मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

-----------

व्यवसाय व उद्योग उभारणीसाठी अर्थसहाय्य...

हातभट्टी व्यावसायिकांचा उद्योग उभा रहावा, व्यवसाय सुरू करावा यासाठी विशेष प्रयत्न सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहेत. व्यवसाय व उद्योग उभारणीसाठी मुद्रा लोन मिळावे यासाठी पोलीस अधिकारी बँकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क करीत आहेत. आतापर्यंत १० ते १२ लोकांनी मुद्रा लोनच्या माध्यमातून व्यवसाय उभा केल्याचे सांगण्यात आले.

 

ऑपरेशन परिवर्तन हा सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या उपक्रमांतर्गत अवैध हातभट्टी निर्मिती करणारी १०० टक्के हॉटस्पॉट ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. हातभट्टी व्यावसायिकांना अन्य व्यवसाय व रोजगारांकडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच जॉब मेळावा अन् कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे.

- तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण पोलीस दल.

 

Web Title: Job fair and skills training will provide employment to the people of Tanda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.