सोलापूरजवळ सुसाट रेल्वेतून पडून जम्मू काश्मिरचा मुलगा जखमी
By विलास जळकोटकर | Updated: July 3, 2024 18:38 IST2024-07-03T18:38:02+5:302024-07-03T18:38:40+5:30
जखमी मुलगा त्याच्या भावासमवेत बेंगलोर येथून दिल्लीकडे जाणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेतून प्रवास करीत होता.

सोलापूरजवळ सुसाट रेल्वेतून पडून जम्मू काश्मिरचा मुलगा जखमी
सोलापूर : बेंगलोरहून दिल्लीकडे जाणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेने दरवाजाजवळ बसून प्रवास करताना १७ वर्षाचा मुलेगा सोलापूरजवळ धावत्या ट्रेनमधून पडून जखमी झाला. बुधवारी सकाळी ७:३० च्या सुमारास ही घटना घडली. संगम सोहनलाल वर्मा (वय १७, रा. चाँदपुरा, जम्मू काश्मिर) असे जखमी मुलाचे नाव आहे.
यातील जखमी मुलगा त्याच्या भावासमवेत बेंगलोर येथून दिल्लीकडे जाणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेतून प्रवास करीत होता. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही रेल्वे सोलापूरपासून दीड किलोमीटर अंतरावर आलेली असताना तो दरवाजाजवळ बसलेला असताना त्याचा तोल गेल्याने खाली पडून तो जखमी झाला.
यात त्याच्या डोक्यास, हाताला जखम झाली. सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर त्याच्या सोबत असलेला भाऊ चमनलाल वर्गा हा खाली उतरला. जखमी भावाला घेऊन येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असून, तो शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.