जलजीवनाच्या कामाची स्थिती रस्त्यावरच कळणार!
By शीतलकुमार कांबळे | Updated: March 30, 2023 19:25 IST2023-03-30T19:25:39+5:302023-03-30T19:25:39+5:30
प्रत्येक कामाच्या ठिकाणी फलक, माहिती मागण्याची नाही गरज

जलजीवनाच्या कामाची स्थिती रस्त्यावरच कळणार!
शीतलकुमार कांबळे, सोलापूर: जिल्ह्यात सध्या जलजीवन मिशनची कामे सुरु आहेत. या कामांत अनियमितता झाल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. त्यामुळे पारदर्शकता येणे गरजेचे आहे. म्हणून ज्या ठिकाणी जलजीवन मिशनची कामे सुरु असतील तिथे त्या कामाच्या माहितीचे फलक लावण्यात येणार असल्याचे सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
जलजीवन मीशनची कामांची माहिती ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध होत नाहीत. त्याचे इस्टीमेट आणि वर्क ऑर्डरबाबत ग्रामस्थाना अवगत केले जात नाहीत, अशा तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी काम सुरु असतील तिथे फळक लावून त्याची माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गटविकास अधिकारी व ग्रामस्थांना पत्र देऊन ग्रामस्थ व ग्रामसभेला विश्वासात घेण्यास सांगितले आहे. प्रत्यक्ष कामे दर्जानुसार झाल्याचे पाहूनच त्याची बीले अदा करा या सूचना दिल्या आहेत.
फलकावर ही असेल माहिती- ज्या गावात जलजीवन मीशनची कामे मंजूर झाली आहेत. त्या गावातील ग्रामस्थांना माहिती मिळावी महणून प्रत्येक गावात बोर्ड लावण्यात येत आहे. यात अंदाजपत्रक कितीचे आहे ? पाण्याचा स्त्रोत कोणता ? किती दिवसांचे काम आहे ? कुठल्या पद्धतीची पाईपलाईन त्यात वापरली जाणार आहे ? या माहितीचा समावेश असणार आहे.